भूसावळचा अभिमान – तीर्थराज पाटीलचा आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत डबल सुवर्ण पदक विजय
भूसावळचा अभिमान – तीर्थराज पाटीलचा आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत डबल सुवर्ण पदक विजय
थायलंडमध्ये भारताचे नावलौकिक वाढवले; भुसावळ शहरात आनंदाचे वातावरण
लेवाजगत न्युज भुसावळ (प्रतिनिधी) –
बँकॉक, थायलंड येथे एम टी एल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट व रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ व्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले चॅम्पियनशिप स्पर्धेत भुसावळचा तीर्थराज मंगेश पाटील याने शानदार कामगिरी करत २ सुवर्ण व ३ रजत पदकांची कमाई केली. या उत्कृष्ट कामगिरीने त्याने संपूर्ण भारताचे व विशेषतः भुसावळ शहराचे नाव उज्वल केले आहे.
ही स्पर्धा १८ जून ते १९ जून २०२५ दरम्यान थायलंडमध्ये पार पडली. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, रशिया, थायलंड यांच्यासह अनेक देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
८ वर्ष वयोगटातील इनलाईन व क्वाडस प्रकारात स्पर्धा झाली. सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी, भुसावळ चा स्केटर आणि एन. के. नारखेडे इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी तीर्थराज पाटील याने दोन सुवर्णपदक पटकावले. तसेच रिले मॅचमध्ये त्याने तीन रजत पदकेही जिंकली. त्याला एम टी एल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक यांच्या वतीने विशेष ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
या घवघवीत यशामध्ये त्याचे प्रशिक्षक पियुष दाभाडे सर, दीपेश सोनार सर आणि आंतरराष्ट्रीय कोच श्री. भिकन अंबे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या प्राचार्या अर्चना कोल्हे मॅडम व खेळ शिक्षक नम्रता गुरव मॅडम यांनीही सतत प्रोत्साहन दिले.
या ऐतिहासिक यशानंतर तीर्थराज पाटील याचे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे, आमदार राजुमामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ तसेच भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केले.
सध्या तीर्थराज पाटीलच्या तळवेल व भुसावळ येथील घरी आनंदाचे वातावरण आहे. तो दिनांक २१ जून रोजी रात्री १ वाजता भारतात परतणार असून २२ जून रोजी भुसावळमध्ये आगमन होणार आहे. त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत