‘मनमंदिर’ लॉजिंगवर यावल पोलिसांचा छापा वेश्याव्यवसाय उघड -तिघांविरोधात गुन्हा,पीडित महिलांची सुटका!
‘मनमंदिर’ लॉजिंगवर यावल पोलिसांचा छापा
वेश्याव्यवसाय उघड -तिघांविरोधात गुन्हा,पीडित महिलांची सुटका!
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-यावल तालुक्यातील किनगाव शिवारात चोपडा-यावल महामार्गालगत असलेल्या ‘मनमंदिर’ परमिट रूम व लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा यावल पोलिसांनी पर्दाफाश केला. गुरुवारी (दि. १९ जून) संध्याकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून मोबाईल, रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेश्याव्यवसायाबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून गोपाळ निंबा पाटील (वय २८, रा. दहिगाव), पराग प्रकाश लोहार (वय २४, रा. खेडी खुर्द), समाधान शालिक तायडे (वय २२, रा. साखळी) या तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत असून, या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांत व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत