इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला-दोन ठार, ३० जण वाहून गेल्याची भीती,कुंडमळा धबधब्याजवळ भीषण दुर्घटना; एनडीआरएफचा बचावकार्य सुरू
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला –दोन ठार,३० जण वाहून गेल्याची भीती
कुंडमळा धबधब्याजवळ भीषण दुर्घटना; एनडीआरएफचा बचावकार्य सुरू
लेवाजगत न्यूज पुणे (प्रतिनिधी):- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. तळेगाव दाभाडेजवळील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवरील जुना पूल अचानक कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.
रविवार असल्याने कुंडमळा धबधब्याजवळ मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. याच गर्दीमध्ये जुना आणि जीर्ण झालेला पूल कोसळला. पुलावर मोठ्या संख्येने नागरिक तसेच दुचाकीस्वार होते. क्षमतेपेक्षा अधिक लोक आणि वजनामुळे पुलाचा ताण वाढल्याने तो कोसळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांना सुखरूप वाचवण्यात बचाव दलाला यश आले असून ३२ जण जखमी झाले आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांनी आपल्या एक्स (Twitter) खात्यावरून माहिती दिली की, "पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून मन व्यथित झाले आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बचाव कार्याला तातडीने वेग देण्यात आले असून विभागीय आयुक्त स्वतः घटनास्थळी रवाना झाले आहेत."
दोन दिवसांपासून मावळ परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून त्यामुळे बचावकार्य अधिक कठीण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ, आपदा मित्र, पोलीस आणि एनडीआरएफचे जवान मिळून बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत.
कुंडमळा हे पुण्याजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, पावसाळ्यात येथे पर्यटकांची विशेष गर्दी असते. हे ठिकाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या जवळच असून पुण्यापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आहे.
दुर्घटनेची ठळक वैशिष्ट्ये:
जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना
२ जणांचा मृत्यू, ३० पर्यटक बेपत्ता
३२ जखमी, त्यात ६ गंभीर
६ जणांना सुखरूप वाचवले
एनडीआरएफ आणि पोलीस दल सक्रिय
या दुर्घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत