“पप्पा, तुम्ही कलेक्टर झालात का?”- या निरागस प्रश्नावर पेटलेल्या बापाच्या मारहाणीत १७ वर्षीय मुलीचा मृत्यू
“पप्पा, तुम्ही कलेक्टर झालात का?” – या निरागस प्रश्नावर पेटलेल्या बापाच्या मारहाणीत १७ वर्षीय मुलीचा मृत्यू
नेलकरंजीत हृदयद्रावक घटना – वडिलांच्या अमानुषपणामुळे हुशार विद्यार्थिनीचा अंत
लेवाजगत न्यूज आटपाडी:- आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात एक हृदयद्रावक आणि समाजमन सुन्न करणारी घटना घडली आहे. बारावीच्या सराव परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून वडिलांनी केलेल्या मारहाणीमुळे १७ वर्षीय साधना धोंडिराम भोसले या मुलीचा मृत्यू झाला. तिचे वडील धोंडिराम भगवान भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे.
साधना ही बारावीची विद्यार्थीनी होती. दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून गावात प्रथम आली होती. वैद्यकीय प्रवेशासाठी खासगी शिकवण्या सुरू होत्या. मात्र नुकत्याच झालेल्या सराव परीक्षेत गुण अपेक्षेपेक्षा कमी आले. यामुळे धोंडिराम भोसले यांनी शुक्रवारी रात्री साधनावर संताप व्यक्त करत तिच्यावर हात उगारला.
साधनाने शांतपणे उत्तर दिले, “पप्पा, तुम्हालाही कमी गुण मिळाले होते, तरी तुम्ही शिक्षक झालात ना?” या निष्पाप प्रश्नाने चिडलेल्या वडिलांनी तिला घरातील दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली आणि लाथाबुक्क्यांनी मारले. पत्नी प्रीती यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण रागात अंध झालेले भोसले थांबले नाहीत.
शनिवारी सकाळी साधना अंथरुणावरून उठू शकत नव्हती, तरीही तिच्यावर कोणतीही वैद्यकीय मदत घेतली गेली नाही. धोंडिराम भोसले शाळेत ‘योग दिन’ कार्यक्रमासाठी गेले आणि परत आल्यावर साधना बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर घाबरलेल्या भोसले यांनी तिला सांगलीतील दवाखान्यात नेले आणि “बाथरूममध्ये पडली” अशी खोटी माहिती दिली. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
शवविच्छेदनात शरीरावर झालेल्या गंभीर मारहाणीचे व्रण आढळून आल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली. आई प्रीती भोसले यांनी धोंडिराम भोसले यांच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली. न्यायालयाने त्यांना २४ जून २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे नेलकरंजी गावात शोककळा पसरली असून, विद्यार्थ्यांवर शिक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या अतीदडपणाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. शिक्षणात यशापेक्षा समजूत, संवाद आणि संवेदनशीलतेची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
लेवाजगत न्यूज
(आपल्या समाजाचे सजग मन)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत