कविता लिहिण्याचा आनंद हा शब्दांच्या पलिकडला'-प्रा.प्रविण दवणे
कविता लिहिण्याचा आनंद हा शब्दांच्या पलिकडला'-प्रा.प्रविण दवणे
लेवाजगत न्यूज उरण: सुनिल ठाकूर- ‘मी काव्याचा, जगण्याचा निखळ आनंद घेतला. काहीतरी मिळवायचंय म्हणून लिहिलं नाही. त्याचा आनंद घेणं हे देवानं, चैतन्यानं, निसर्गानं मला शिकवलं' असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.प्रविण दवणे यांनी वाशी येथील शिवतुतारी प्रतिष्ठान संचालित कविता डॉट कॉम या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनी त्यांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीतून केले.
येथील मराठी साहित्य, संस्कृती आणि कला मंडळाच्या सभागृहात २२ जून रोजी ''शिवतुतारी - कविता डॉट कॉम" चा तिसरा वर्धापनदिन साजरा झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. दवणे यांनी कवितेचे गीत कसे होते, चित्रपटगीते रचताना कवित्वाचा कसा उपयोग होतो हे विविध उदाहरणे देत सांगताना लता मंगेशकर, उषा मंगेशकर, संगीतकार मीना खडीकर, सुमन कल्याणपूर, अनिल मोहिले, अशोक पत्की, अजय अतुल आदि दिग्गजांसमवेत काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला. नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी आणि प्रा. दवणे यांचे एकेकाळचे विद्यार्थी महेंद्र काेंडे यांनी त्यांना मुलाखतीतून बोलते केले. यावेळी मागील वर्धापनदिन सोहळ्याचे अध्यक्ष साहित्यिक अरुण म्हात्रे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे प्रा. दवणे यांच्याकडे संतश्रेष्ठ तुकारामांच्या गाथेच्या रुपात सुपर्द केली. श्री म्हात्रे यांनीही याप्रसंगी गीते, कविता, मालिका, विविध कविसंमेलनातील अनुभव आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी तिसरा जीवनगौरव पुरस्कार प्रा. दवणे, प्रा. म्हात्रे यांच्या हस्ते व शिवतुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा, रविंद्र पाटील, ‘साहित्य मंदिर'चे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, समाजसेवक परशुराम ठाकूर यांच्या उपस्थितीत शाल, सन्मानपत्र, शिवमुद्रा तसेच सुरेख अशी नॅपकिनपासून बनवलेली पुष्पकुंडी या स्वरुपात दै. ‘आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत यांना सपत्निक प्रदान करण्यात आला.
‘आपण तीस वर्षाहुन अधिक काळ पत्रकारिता केली असल्याने हा पुरस्कार वयाच्या ६३ च्या वर्षी स्वीकारत असल्याचे' या सत्काराला दिलेल्या उत्तरात नमूद करतानाच ‘अशा प्रकारचे पुरस्कार हे योग्य वयातच द्या, गलितगात्र झालेल्या अवस्थेत सत्कारमूर्तीला मुला-सुनांनी व्यासपीठावर आणण्याची वेळ आणू नका; मरणोत्तर बहुमान हे केवळ सीमेवर लढलेल्या जवानांनाच योग्य वाटतात' असे घरत यांनी नमूद केले. ‘शिवतुतारी प्रतिष्ठान'च्या प्रा. रविंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी समारंभाचे अध्यक्ष, सत्कारमूर्ती व पाहुणे यांना वितरीत करण्यात आलेल्या सुरेख सन्मानपत्रांचे रेखाटन प्रख्यात सुलेखनकार विलासराव समेळ यांनी केले होते. तर नॅपकिन बुके गोरखनाथ पोळ यांनी बनवली होती. प्रा. शंकर गोपाळे व नारायण लांडगे यांनी प्रारंभीची बतावणी व नेटके निवेदन सादर केले. बाल कवी-कवयित्री तसेच निमंत्रित कवींचे संमेलनही कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पार पडले. अमोलकुमार वाघमारे यांनी आभार मानले. शिवतुतारीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविश्रांत मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत