देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”
देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”
लेवाजगत न्यूज नाशिक-संपूर्ण इतिहासात कोणतेही क्षेत्र काढून बघा, त्यात चित्तपावन समाजाची लोकं दिसतात स्वातंत्र्य चळवळ, कला आणि साहित्य क्षेत्र बघा त्यातील दहा नावं काढली तर त्यात तीन ते चार नावं चित्पावन ब्राह्मण समाजाची असतात. राजकीय क्षेत्रात संख्या महत्त्वाची असते असं म्हणत ब्राह्मण समाजाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परशुराम भवनाचं उद्घाटन नाशिक या ठिकाणी करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मी चित्पावन ब्राह्मण संघाचं मनापासून अभिनंदन करतो की परशुराम भवन ही सुंदर वास्तू बांधली आणि त्याचं उद्घाटन करण्याची संधी मला दिली त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. तुम्ही केवळ भवनच उभारलं नाहीत तर हॉस्टेलही उभारलं आहे. ज्यामध्ये ४० मुलांना राहण्याची व्यवस्था असेल. एनडीए किंवा तत्सम प्रोफेशनल परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन आणि मदत करण्याचा निर्णय जो घोषित झाला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. नाशिकला सकाळी आलो ते सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये आयोजित केला जाणार आहे त्यासंदर्भात. विविध पर्वण्यांच्या तारखांची घोषणा आज केली त्यानंतर इथे आलो. मला अतिशय आनंद आहे की ९३ वर्षे सातत्याने एखादी सामाजिक संघटना काम करते आहे. विविध प्रकल्प उभारत समाजाला एकत्र ठेवत, समाजातील गरजूंना मदत करत पुढे जाते अशी उदाहरणं कमी दिसतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चित्पावन ब्राह्मण समाज बुद्धिमान आणि मेहनती
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, चित्पावन ब्राह्मण संघ नाशिक यांचं पुस्तक मी पाहिलं. त्यामध्ये १९३३ ला सभा झाली होती त्याचंही इतिवृत्त वाचायला मिळालं. ज्ञातीच्या संस्था यासाठीच निर्माण करतो की त्या संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या चांगल्या लोकांचं एकत्रीकरण करता आलं पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास बघितला तर समाजाचं कुठलंही क्षेत्र काढून बघा, त्यामध्ये आपल्याला अग्रणी चित्पावन ब्राह्मण समाजाचे लोक पाहण्यास मिळतील. हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तयार केलं ते वाढवण्याचं काम असो, भारतीय स्वातंत्र्य लढा असो, समाजातील सुधारणा करण्याचं क्षेत्र असो, कला आणि साहित्य क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र पाहिलं तर त्या क्षेत्रातली १० ठळक नावं काढली तर त्यातली किमान तीन ते चार नावं चित्पावन ब्राह्मण समाजाची पाहण्यास मिळतात. कारण अतिशय बुद्धिमान आणि अतिशय मेहनती अशा प्रकारचा आपला ब्राह्मण समाज आहे. अत्यंत विषम परिस्थितीतून वर आलेला समाज पाहण्यास मिळतो. सामान्य, मध्यमवर्गीय, गरीब असूनही आपल्या समाजाचे स्वतःच्या कर्तृत्त्वाने पुढे आलेले लोक आपल्या समाजात पाहण्यास मिळतात.
ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकी पण…
जात अशी असते जी कधी जात नसते. जातीय व्यवस्था असू म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये हे म्हणणं जास्त समर्पक ठरेल. अनेकदा विषमता दूर करताना आपल्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. मला लोक विचारतात तेव्हा मी सांगतो की राजकीय क्षेत्रात संख्या महत्त्वाची असते. सगळ्या प्रकारचे जातीय लोक तुम्ही बघितले, सगळ्या प्रकारचे ब्राह्मण बघितले तर त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असते. मग मला विचारणा होते की हे चालायचं कसं? तर मी त्यांना नेहमी सांगतो की ब्राह्मण समाजाचं काम काय ? तर दुधात साखरेचं काम करणं हे ब्राह्मण समाजाचं काम आहे. साखर चिमूटभरच लागते पण ती चिमूटभर साखर जेव्हा दुधात टाकली जाते तेव्हा दूध गोड लागतं. आपल्याला तसंच काम समाजात करायचं आहे. समाजात साखरेसारखा गोडवा कसा निर्माण करता येईल हे काम आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर समाजाच्या आणि देशाच्या विकासात जसं ऐतिहासिक योगदान आहे तसंच आपली पुढची पिढी योगदान देईल असे संस्कार कसे देता येतील याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत