जळगावहून मुंबईला अवघ्या ५ तासांत! समृद्धी महामार्गाशी जोडणीसाठी हालचाली वेगात; नागपूर येथे मुख्यमंत्री, गडकरींच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
जळगावहून मुंबईला अवघ्या ५ तासांत!
समृद्धी महामार्गाशी जोडणीसाठी हालचाली वेगात; नागपूर येथे मुख्यमंत्री, गडकरींच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
लेवाजगत न्यूज जळगाव :– जळगाव जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणारा निर्णय रविवारी नागपूर येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जळगावला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले.
या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार मंगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
पाच तासांत मुंबईचा प्रवास
सध्याच्या परिस्थितीत जळगावहून अजिंठा व सिल्लोड मार्गे छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. हा प्रवास एका तासावर आणण्याचे नियोजन असून, पुढे समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईला अवघ्या चार तासांत पोहोचता येणार आहे. त्यामुळे जळगावहून मुंबईचा प्रवास आता फक्त ५ तासांमध्ये शक्य होणार आहे.
औट्रम घाटात १२.७५ किमी बोगदा
जळगाव ते चाळीसगाव – कन्नड मार्गावरील औट्रम घाटात १२.७५ किलोमीटर लांबीचा भुयारी बोगदा बांधण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन बैठकीत जाहीर झाले. यासाठी अंदाजे २६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई प्रवासात ३-४ तासांची बचत
सध्या नाशिकमार्गे मुंबई गाठायला जळगावकरांना आठ तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी झाल्यास हा प्रवास तीन ते चार तासांनी कमी होणार आहे. यामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर व्यापार, पर्यटन व गुंतवणूकालाही नवे क्षितिज खुले होणार आहे.
मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया :
“समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी म्हणजे उत्तर महाराष्ट्रासाठी सुवर्णसंधी आहे. यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.”
📰 लेवाजगत न्यूज
📍 आपली विश्वासार्ह स्थानिक बातमी सेवा
📞 संपर्क: 8668414507 / 📧 lewajagat@gmail.com
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: www.lewajagatnews.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत