जळगाव हादरले!१३ वर्षीय तेजस महाजनची गळा चिरून हत्या-नरबळीचा संशय
जळगाव हादरले! १३ वर्षीय तेजस महाजनची गळा चिरून हत्या-नरबळीचा संशय
लेवाजगत न्यूज जळगांव:- जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा बालकाच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राहणाऱ्या तेजस गजानन महाजन (वय १३) या शाळकरी मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हत्येमागे नरबळीचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तेजस महाजन हा आपल्या कुटुंबासोबत रिंगणगाव येथे राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन हे शेती व्यवसायासोबत कृषी केंद्राचे दुकान चालवतात. सोमवारी, १६ जून रोजी गजानन महाजन हे काही कामासाठी जळगावला गेले होते. याच दिवशी गावात आठवडी बाजारही होता. तेजस दुकान बंद करून घरी येईल असे कुटुंबीयांना वाटत होते. मात्र रात्री उशीर झाला तरी तो घरी परतला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू केला. अखेर रात्री उशिरा एरंडोल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
दरम्यान, मंगळवारी १७ जून रोजी सकाळच्या सुमारास रिंगणगाव शिवारातील खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात एक बालकाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. मृतदेहाची ओळख तेजस महाजन म्हणून पटली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलीस तपासात अद्यापही ठोस कारण समोर आले नसले तरी प्राथमिक तपासात नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले आहेत.
ही घटना केवळ एक हत्या नसून, अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या अमानुषतेचा भयावह नमुना आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरून गेला असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत