Header Ads

Header ADS

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याकडून जळगाव कृषी फीडर प्रकल्पाचा आढावा, कामांना गती देण्याचे निर्देश


 केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याकडून जळगाव कृषी फीडर प्रकल्पाचा आढावा, कामांना गती देण्याचे निर्देश


लेवाजगत न्युज जळगाव: केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी आज जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी फीडर विभक्तीकरण प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. केंद्र शासनाच्या पुनर्रचना वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत जळगाव जिल्ह्यात हा महत्त्वाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.


या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, कामांची टक्केवारी, अंमलबजावणीतील अडथळे आणि तालुकानिहाय कामांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली.


मंत्री खडसे यांनी चालू कामांना अधिक गती देण्याचे आणि अंमलबजावणीतील अडथळ्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. स्थानिक प्रशासन, महावितरण आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला, जेणेकरून प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करता येईल.


या योजनेमुळे शेतीसाठी वेळेवर आणि योग्य दाबाने वीज मिळाल्याने उत्पादनात वाढ होईल आणि शेती फायदेशीर ठरेल, असे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले.



बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रगती अहवाल सादर करत उर्वरित कामांसाठी कालबद्ध आराखडा मांडला. प्रत्येक तालुक्यातील अडथळ्यांवर उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना निश्चित वेळेत आणि अखंड वीजपुरवठा शक्य होणार असून शेतीला चालना मिळेल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्यासह जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, महावितरणचे मुख्य अभियंता श्री. विनोद पाटील, पायाभूत आराखडा विभागाचे मुख्य अभियंता श्री. मनोज विश्वासे, सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गणेश महाजन तसेच विविध जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.