हरवलेला लॅपटॉप परत मिळवून दिला;फैजपूर पोलिसांची तत्परता व कौशल्याची चमकदार कामगिरी
हरवलेला लॅपटॉप परत मिळवून दिला;फैजपूर पोलिसांची तत्परता व कौशल्याची चमकदार कामगिरी
लेवाजगत न्यूज फैजपूर-अनेकदा पोलिसांवर तपासात दिरंगाईचे आरोप होतात. मात्र, प्रत्येकवेळी हे खरे असतेच असे नाही. अनेकदा पोलिस माहिती मिळताच तत्परतेने लोकांची मदत करतात. असाच प्रसंग फैजपूर पोलिस ठाण्यात घडला. रिक्षात महागड्या लॅपटॉपची बॅग हरवल्याने चिंताग्रस्त झालेला विद्यार्थी मदतीसाठी आला. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे व सहकाऱ्यांनी वेगाने तपास करून त्याचा लॅपटॉप परत मिळवून दिला. अकोला येथे एमबीएच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा सोहम सुजितसिंग राजपूत हा १५ जूनला फैजपूर येथील आजोबा पी.जे.राजपूत यांना भेटण्यासाठी आला होता. तो अकोला येथून रेल्वेने भुसावळपर्यंत आला. भुसावळ येथून अॅपेरिक्षामध्ये बसून फैजपूर येथील छत्री चौकात उत्तरला. यावेळी त्याने रिक्षातून इतर दोन बॅगा काढल्या. पण, ३० हजार रुपयांचे लॅपटॉप असलेली बॅग रिक्षात विसरला. यानंतर घरी गेल्यावर लॅपटॉपचा शोध घेतला. पण, लॅपटॉप न मिळाल्याने ते फैजपूर पोलिस ठाण्यात मदत मागण्यासाठी गेले.
ठाणे अंमलदार तथा सहाय्यक फौजदार संजय झाल्टे यांनी ही माहिती प्रभारी अधिकारी रामेश्वर मोताळे यांना कळवली. त्यांनी फैजपूर येथे वाहतूक ड्युटी करणारे अंमलदार सलीम तडवी यांना संबंधित रिक्षावाल्यांकडे सोहमच्या बॅगेचा शोध घेण्यास सांगितले. तडवींनी अॅपेरिक्षा संघटना अध्यक्ष, अॅपेरिक्षा चालकांकडून माहिती घेतली. त्यात लॅपटॉपची बॅग नजरचुकीने घेऊन जाणारे मुकेश तिरोले (रा.नहालदरी जि. खरगोन, मध्य प्रदेश) यांचेकडून बॅग व त्यातील लॅपटॉप ताब्यात घेऊन तो १६ जूनला सोहम राजपूत या विद्यार्थ्याला परत देण्यात आला. यामुळे आनंदीत झालेल्या सोहमने पोलिसांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत