Header Ads

Header ADS

अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या होणार चार प्रवेश फेऱ्या; व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठीचे नियमही बदलणार

 




अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या होणार चार प्रवेश फेऱ्या; व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठीचे नियमही बदलणार





लेवाजगत न्यूज मुंबई : पॉलिटेक्निक (अभियांत्रिकी पदविका) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आल्यानंतर आता अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्येही बदल करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या आता तीन ऐवजी चार प्रवेश फेऱ्या होतील. तसेच व्यवस्थापन कोट्यातून भरण्यात येणाऱ्या जागांचे अर्ज महाविद्यालयांबरोबरच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी कक्ष) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर होईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल १६ जूनपर्यंत जाहीर होणे अपेक्षित असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तीनऐवजी चार फेऱ्या आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच पहिल्या फेरीमध्ये प्रथम प्राधान्य, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये अनुक्रमे पहिले तीन व पहिले सहा महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम बंधनकारक असेल.


फेरीनुसार निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार विद्यार्थ्यांनी त्या जागांवर प्रवेश न घेतल्यास त्यांचा त्या जागेवरील दावा आपोआप रद्द होईल. त्याचप्रमाणे हे विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत. तसेच दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी पात्र उमेदवारांना पुन्हा एकदा ऑनलाइन प्राधान्यक्रम भरण्याची किंवा त्यात बदल करण्याची मुभा असेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

व्यवस्थापन कोट्याचा अर्ज सीईटीच्या संकेतस्थळावर

व्यवस्थापन कोट्यातील उपलब्ध जागांची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर टाकणे महाविद्यालयांसाठी बंधनकारक असेल. विद्यार्थी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावरून या जागांसाठी अर्ज करू शकतील. तसेच थेट संस्थेकडे जाऊनही अर्ज करू शकतील. हे प्रवेश पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर करण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. शुल्क नियामक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्काच्या तिप्पट शुल्क आणि एनआरआय विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याची मुभा संस्थांना असेल.

एनआरआय कोट्याच्या नियमातही बदल एनआरआय कोट्यातून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना आयकर विभागाचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे. तसेच पाल्य-पालक कायद्यानुसारच हे प्रवेश भरले जाणार असून त्याची काटेकोर अमलबजावणी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.