दोन आरोपी जेरबंद-अफू वाहतूक करणाऱ्या टोळीवर चोपडा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई
अफू वाहतूक करणाऱ्या टोळीवर चोपडा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई : दोन आरोपी जेरबंद, महिंद्रा XUV500 कार अपघातग्रस्त
लेवाजगत न्यूज चोपडा -तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत २५ जुलै रोजी अफू वाहतूक प्रकरणाचा मोठा छडा लावत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात कारमधून अफूच्या झाडाची बोंडे सापडली असून, आरोपी हे वाहतुकीसाठी वॉचर म्हणून काम करत असल्याचे उघड झाले आहे.
पारउमर्टी (ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) हे गाव थेट उमर्टी (ता. चोपडा) या गावाच्या सिमेवर आहे. मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गांजा, गावठी दारू, अवैध कट्टे, गुटखा आणि अंमली पदार्थांची चोरीछुपे वाहतूक होत असल्याच्या वारंवार तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब घोलप यांच्या संकल्पनेतून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या एक महिन्यापासून २४ तास सतत नाकाबंदी ठेवण्यात येत आहे.
दिनांक २५/०७/२०२५ रोजी सत्रासेन नाक्यावर नाकाबंदी ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील (पोकाँ ९२७) व शिवाजी बाविस्कर (सफौ २७९३) यांना उमर्टीकडून दोन कार येताना दिसल्या. त्यांनी पहिली स्विफ्ट कार (क्र. GJ 06 LS 0075) थांबवून तपासणीस सुरुवात केली. त्या दरम्यान, पाठीमागून आलेली महिंद्रा XUV500 (MH 12 LD 8141) कारने नाकाबंदी पाहताच यु-टर्न घेतला व पळून जाऊ लागली. याचवेळी पहिली कारदेखील नाकाबंदीवरील लोखंडी बॅरिकेड तोडून पळून गेली.
तत्काळ हा प्रकार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना फोनवरून कळवण्यात आला. त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यातील पोकॉ चेतन महाजन , किरण पारधी, किशोर माळी यांना घेऊन लासूर-हातेड रस्त्यावर जाऊन स्थानिक नागरिक नरेंद्र मोरे व प्रमोद शिरसाठ यांच्या मदतीने दुसरी नाकाबंदी लावली. काही वेळातच तेथून भरधाव वेगाने पळणारी कार पकडण्यात पोलिसांना यश आले.
स्विफ्ट कारमधून पकडण्यात आलेल्या दोघांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
- पांचाराम सोनाराम विश्नोई, रा. उदासर, ता. गुडामालाणे, जि. बडमोर, राजस्थान
- सुरेशकुमार गोपालराम कुमार, रा. रणोदर, ता. चितलवाडा, जि. जिल्लोर, राजस्थान
या दोघांनी प्राथमिक चौकशीत सांगितले की, ते महिंद्रा XUV500 या कारच्या पुढे "वॉचर" म्हणून जात होते. सदर महिंद्रा कार रोहिणी भोटेक (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे झालेल्या अपघातात उलटली असून, त्या कारमधून अफू या अंमली पदार्थाच्या झाडाची बोंडे सापडली आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच सांगवी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले असून त्यांनी महिंद्रा कारवर पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
या अनुषंगाने स्विफ्ट कारमधून पकडलेले दोन्ही आरोपी पुढील कारवाईसाठी सांगवी पोलीस स्टेशन (जि. धुळे) यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी आणि त्यांच्या टीमने सतर्कतेने दाखवलेली तत्परता व कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला.
— लेवा जगत न्यूज



कोणत्याही टिप्पण्या नाहीत