Contact Banner

मोहन भागवत यांची मशिदीला भेट, देशभरात खळबळ; नितेश राणेंची स्पष्ट भूमिका : “भारत माता की जय म्हणणाऱ्यांना आम्ही आपले मानतो, पण देशविरोधी विचारांचा तीव्र विरोध”

 

Nitesh Rane on Mohan Bhagwat meets Muslims religious leaders






भागवत यांची मशिदीला भेट, देशभरात खळबळ; नितेश राणेंची स्पष्ट भूमिका : “भारत माता की जय म्हणणाऱ्यांना आम्ही आपले मानतो, पण देशविरोधी विचारांचा तीव्र विरोध”

लेवा जगत न्यूज, मुंबई –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी (२४ जुलै) दिल्लीतील एका मशिदीला दिलेल्या भेटीमुळे देशभरात राजकीय चर्चांना आणि उलटसुलट प्रतिक्रियांना सुरुवात झाली आहे. या भेटीत त्यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलयासी यांच्यासह इतर मुस्लिम नेत्यांशी जवळपास तासभर चर्चा केली. ही बैठक बंद दाराआड पार पडली असली तरी तिच्या बातम्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

या पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना निशाण्यावर घेत त्यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले की, “हिंदुत्वाच्या नावाने घोषणा करणारे नितेश राणे भागवतांच्या या मशीद भेटीचा निषेध करणार का? त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.”

या टीकेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. जी व्यक्ती या देशात राहते, भारताला आपला देश मानते आणि ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देते, ती व्यक्ती आमच्यासाठी हिंदू असो की मुसलमान – आमचीच आहे.”

याचबरोबर राणे म्हणाले की, “जो मुसलमान छातीठोक ‘भारत माता की जय’ म्हणतो, त्याला आम्ही स्वीकारतो. मात्र जो भारतात राहून देशाच्या विरोधात काम करतो, ‘जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘गजवा-ए-हिंद’ यासारख्या संकल्पनांच्या माध्यमातून भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रवृत्तीचा आम्ही स्पष्टपणे विरोध करतो.”

भागवतांच्या भेटीबाबत बोलताना राणे म्हणाले, “या भेटीतून समाजात देशविरोधी मानसिकता बाळगणाऱ्यांना काहीतरी बोध मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे.”


लेवा जगत न्यूजच्या वाचकांसाठी ही घटना म्हणजे राष्ट्रीय आणि धार्मिक समरसतेचा एक भाग असला, तरी यामागील राजकीय व सामाजिक परिणाम दूरगामी असण्याची शक्यता आहे. मोहन भागवतांच्या या भेटीनंतर संघ परिवार आणि मुस्लिम समाजातील संवादाचा नवा अध्याय सुरू होणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.