लाच घेताना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी रंगेहाथ अटकेत
लाच घेताना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी रंगेहाथ अटकेत
लेवाजगत न्यूज जळगाव – जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागातील प्रभारी अधिकारी असलेल्या माधुरी भागवत यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जळगाव युनिटने रंगेहाथ अटक केली. पगार बीलावर सह्या करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदार हे भौतिक उपचारतज्ञ तसेच प्रभारी अधीक्षक (वर्ग २) या पदावर शासकीय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव येथे कार्यरत आहेत. दिनांक १४ जुलै २०२५ रोजी ते पगार बिलासंदर्भात जिल्हा परिषद कार्यालयात गेले असता, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती माधुरी भागवत यांनी जुन महिन्याचे पगार बीलवर कोणतीही त्रुटी नोंदवता सह्या करण्यासाठी १२,०००/- रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. २२ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने प्राथमिक पडताळणी केली असता, आरोपीने प्रत्यक्ष तक्रारदाराकडून १०,०००/- रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर सुरुवातीला ५,०००/- रुपये प्रथम हप्त्याच्या स्वरूपात घेण्याचे ठरले.
त्यानुसार दि. २४ जुलै २०२५ रोजी, तक्रारदाराकडून पंचासमक्ष लाचेची ५,०००/- रुपये रक्कम स्वीकारताना आरोपी अधिकारी श्रीमती माधुरी भागवत यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या पथकाने केली असून, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला होता. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. या कारवाईसाठी सापळा पथकात जीपीएसआय सुरेश पाटील, पोहेकाँ शैला धनगर, पो.काँ. प्रणेश ठाकूर आणि पो.काँ. सचिन चाटे यांचा समावेश होता.
या संपूर्ण मोहिमेस मा. पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे व अपर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेड्डी (एसीबी, नाशिक परिक्षेत्र) यांचे मार्गदर्शन लाभले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने शासकीय कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास, तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
☎️ संपर्क क्र.: 0257-2235477
📞 टोल फ्री क्र.: 1064
लेवा जगत न्यूज – जनतेचा विश्वास, भ्रष्टाचारविरोधातील निर्धार.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत