सावदा येथे श्री स्वामिनारायण मंदिरात ‘हिंडोळा महोत्सवाला’ शनिवारपासून भक्तिभावाने सुरुवात
सावदा येथे श्री स्वामिनारायण मंदिरात ‘हिंडोळा महोत्सवाला’ शनिवारपासून भक्तिभावाने सुरुवात
श्रावण महिन्यातील वैशिष्ट्यपूर्ण भक्ती उत्सव; संत मंडळींच्या उपस्थितीत होणार विविध धार्मिक कार्यक्रम
लेवाजगत न्यूज, सावदा –आषाढ वद्य द्वितीया, संवत २०८१, दिनांक १२ जुलै २०२५ पासून वडताल धाम अंतर्गत असलेल्या १११ वर्षे जुने श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा येथे वार्षिक हिंडोळा महोत्सवाला उत्साही वातावरणात सुरुवात झाली आहे. भगवान श्रीकृष्ण आणि श्री स्वामिनारायण यांच्यावरील भक्तिपूर्ण श्रद्धेचे प्रतीक असलेला हा महोत्सव श्रावण वद्य द्वितीया पर्यंत म्हणजेच सुमारे एक महिना, विविध भक्तिपर कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आहे.
स्वामिनारायण संप्रदायामध्ये हिंडोळा महोत्सवाला विशेष धार्मिक व भावनिक महत्त्व आहे. भगवान स्वामिनारायण पृथ्वीवर असताना साधू-संत आणि भक्तगण त्यांना प्रेमपूर्वक झुलवत असत. त्या दिव्य स्मृती आजही संप्रदायामध्ये भक्तिभावाने जपल्या जातात.
या परंपरेचा गौरव राखत वडताल धामचे आचार्य श्री राकेशप्रसादजी महाराज, शास्त्री स्वामी धर्मप्रसाददासजी, शास्त्री स्वामी भक्तिप्रकाशदासजी यांच्या आशीर्वादाने, तसेच मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी धर्मकिशोरदासजी, शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदासजी, भंडारी स्वामी माधवप्रियदासजी आणि पुजारी स्वामी सत्यप्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव साजरा होत आहे.
या महोत्सवाच्या काळात दररोज संध्याकाळी भगवान श्रीकृष्ण व स्वामिनारायण यांना भव्य स्वरूपात सजवलेल्या हिंडोळ्यावर विराजमान करण्यात येते. त्यावेळी प.पू. मुक्तानंद स्वामी, ब्रह्मानंद स्वामी, प्रेमानंद स्वामी आदी संतांनी रचलेली रागदारीयुक्त पदे भक्तांद्वारे गायली जातात. या गायनातून भक्तिभावाने भरलेले वातावरण प्रसन्नतेने नटते.
श्रावण महिन्यात या महोत्सवाला विशेष निखार येतो. यानुसार, विविध संकल्पनांवर आधारित सजावटीचे सुंदर व आकर्षक हिंडोळे मंदिरात सजवले जात असून, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
मंदिर प्रशासन व तरुण हरिभक्तांच्या एकत्रित प्रयत्नांतून संपूर्ण आयोजन अत्यंत भव्य व सुंदर स्वरूपात पार पडत आहे. या निमित्ताने सावदा परिसरातील तसेच इतर भागांतून येणाऱ्या भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मंदिर ट्रस्टतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांनी या भक्तिसोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
🪔 जय स्वामिनारायण!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत