कोण एकनाथ खडसे? पत्रकारांच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांचा सवाल
कोण एकनाथ खडसे? पत्रकारांच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांचा सवाल
लेवाजगत न्युज जळगाव:- भाजप नेते गिरीश महाजन यांना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, कोण एकनाथ खडसे? असा प्रतिप्रश्न करत महाजनांनी खडसेंना टोला लगावला. गिरीश महाजन यांनी अशाप्रकारे प्रश्न विचारत खडसेंना डिवल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. महाजनांच्या या वक्तव्यावर आता खडसे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात सातत्याने वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं. आतादेखील गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"एकनाथ खडसे विधान परिषदेत काही बोलत असतील तर त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. एकनाथ खडसे यांनी नार-पार प्रकल्प खोऱ्याबाबत प्रश्नच चुकीचा विचारला. म्हातारपणामुळे माझी बुद्धी कमजोर झाली आहे, असं स्वतःच एकनाथ खडसे यावेळी म्हटले. मला वेड लागलं असं काहीतरी ते म्हटले. मात्र ते ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांना असं म्हणणार नाही", असं म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला.
"बोरसे नावाचा डेप्युटी इंजिनिअर त्यांच्याकडे पंधरा वर्षे होता. घरगड्यासारखा त्यांनी कामाला ठेवून घेतला होता. आपण जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा आपल्यालाही कळायला पाहिजे की आपण काय पराक्रम केलेले आहेत. आपल्या आवडीनिवडीचे अधिकारी आपण कसे ठेवले? चार-पाच वर्षे झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये तुमचा काय इंटरेस्ट आहे? आता मला जास्त बोलायचं नाहीय. मात्र एकदा बोरसे नावाचा अधिकारी आपण आपल्याकडे घरगड्यासारखा कामाला ठेवला होता. त्याची आठवण मी त्यांना यानिमित्ताने एकदा करून देतो", असं गिरीश महाजन म्हणाले.
गिरीश महाजन जयंत पाटील यांच्याबद्दल म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. याबाबतच्या वृत्तावरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. "जयंत पाटील त्यांच्या पक्षामध्ये फार खुश आहेत, असं मला वाटत नाही. कालांतराने बघू यामध्ये आता काय काय बदल होतो. माझ्या संपर्कात ते नेहमी असतात. मात्र याबद्दल त्यांच्याशी कधी बोलणं झालं नाही", अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत