हनीट्रॅप प्रकरणात खळबळ: खडसे यांची एसआयटी चौकशीची मागणी, प्रफुल्ल लोढाचे नाव घेतले
हनीट्रॅप प्रकरणात खळबळ: खडसे यांची एसआयटी चौकशीची मागणी, प्रफुल्ल लोढाचे नाव घेतले
लेवाजगत न्यूज, मुंबई –राज्यात गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. या प्रकरणात खडसे यांनी थेट जळगावचे प्रफुल्ल लोढा या व्यक्तीचे नाव घेतले असून, त्याच्याकडे या संपूर्ण हनीट्रॅप प्रकरणाची माहिती असल्याचा दावा केला आहे.
खडसे म्हणाले की, "प्रफुल्ल लोढाकडे या प्रकरणातील सर्व व्हिडिओ क्लिप्स आहेत. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे शक्य नाही. त्यामुळे यामध्ये एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे."
राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणात काही आजी-माजी मंत्री व उच्चपदस्थ अधिकारी अडकल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खडसे यांनी पुन्हा एकदा प्रफुल्ल लोढाचे नाव घेतले असून, त्यानेच एक व्हिडीओ तयार करून धमकीवजा वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला. "एक बटण दाबलं की देशभरात हाहाकार माजेल, पण मी कुणाला तरी आई व वहिनी म्हटलं आहे", असं त्या व्हिडिओत लोढा म्हणतो, अशी माहिती खडसे यांनी दिली.
या प्रकरणावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनीही एक ट्विट करत प्रफुल्ल लोढा याचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत या फोटोची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
राऊत यांनी यामध्ये 4 मंत्री व अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावाही केला असून, याच हनीट्रॅपमुळे शिवसेनेतून फुटलेले काही खासदार पळाले होते, असेही ते म्हणाले.
संपादन – लेवाजगत न्यूज डेस्क
(संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पुढील तपशीलासाठी आमच्याशी जोडलेले राहा.)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत