ढाकामध्ये हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळले; मृत्यू व जखमींची भीती
ढाकामध्ये हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळले; मृत्यू व जखमींची भीती
ढाका (बांगलादेश), २१ जुलै –
बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे एफ-७ हे चीनी बनावटीचे विमान सोमवारी ढाका येथील एका शाळेच्या इमारतीवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत कमीतकमी एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान राजधानी ढाकाच्या उत्तर भागातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेज या शैक्षणिक संस्थेच्या इमारतीवर कोसळले. अपघातवेळी शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थित होते, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेनंतर परिसरात भीषण आग लागली असून आगीचे लोट व काळा धूर दूरवरूनही दिसत होता. घटनास्थळी अग्निशमन दल, लष्करी बचाव पथक आणि पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हे विमान शाळेच्या कॅन्टीन भागावर दुपारी दीडच्या सुमारास कोसळले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून तपास यंत्रणांकडून घटनेची चौकशी सुरू आहे. बांगलादेश सरकार आणि हवाई दलाकडून या संदर्भात अधिकृत निवेदन अपेक्षित आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत