रेव्ह पार्टी प्रकरण : "कोणी दोषी असेल तर शिक्षा होईलच, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न झाला तर सहन करणार नाही" – एकनाथ खडसे
रेव्ह पार्टी प्रकरण : "कोणी दोषी असेल तर शिक्षा होईलच, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न झाला तर सहन करणार नाही" – एकनाथ खडसे
प्रतिनिधी | लेवा जगत न्यूज, जळगाव |
पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू वसाहतीतील फ्लॅटमध्ये पार पडलेल्या कथित रेव्ह पार्टी प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली स्पष्ट भूमिका मांडली.
"जर माझे जावई या प्रकरणात दोषी असतील, तर मी त्यांचे समर्थन करणार नाही. कायद्याने जे योग्य आहे, ते व्हावे. पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही," असे खडसे यांनी ठामपणे सांगितले. सध्या प्रांजल खेवलकर हे पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांच्याशी थेट संपर्क झालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
खडसे पुढे म्हणाले, “राज्यात सध्या जे वातावरण आहे, त्यावरून अशा प्रकारची कारवाई होऊ शकते याचा थोडा अंदाज होता. माध्यमांमधून जे पाहिले त्यावरच सध्या मी प्रतिक्रिया देत आहे. मात्र पोलिसांनी निष्पक्ष आणि प्रामाणिक तपास करावा, हीच अपेक्षा आहे. कारण जनतेमध्ये पोलिस प्रशासनाबद्दल काहीशा संशयाचे वातावरण आहे.”
"तथ्य स्पष्ट होतील, नंतर पत्रकार परिषद घेईन"
फॉरेन्सिक तपासणी आणि रक्ताच्या नमुन्यांचे रिपोर्ट आल्यानंतरच या प्रकरणावर अधिक स्पष्ट बोलता येईल, असे सांगत खडसे यांनी सध्याच्या माहितीच्या आधारावर आरोप-प्रत्यारोप करणं टाळावं, असं आवाहन केलं. "तथ्य बाहेर आल्यानंतर मी पुन्हा पत्रकार परिषद घेईन," असेही त्यांनी स्पष्ट केले.
गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर बोलताना राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली. "मला सुरुवातीला काही माहिती नव्हती, मात्र अनेक फोन आल्यानंतर बातम्यांतून समजले की ही पार्टी प्रांजल खेवलकर यांनीच आयोजित केली होती. या ठिकाणी दारु, हुक्का आणि ड्रग्ज मोठ्या प्रमाणात आढळून आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे," असे त्यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी पुण्यातील खराडी येथील एका लक्झरी अपार्टमेंटवर छापा टाकून रेव्ह पार्टी उधळून लावली. या पार्टीमध्ये दारू, हुक्का आणि अमली पदार्थ आढळून आले असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील एक नाव प्रांजल खेवलकर यांचे असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुढील तपास अहवाल आणि चाचण्या आल्यानंतरच या प्रकरणातील खरे स्वरूप समोर येणार आहे. तोपर्यंत राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा, कायद्याने आणि सत्याने मार्ग शोधण्याची गरज आहे.
— लेवा जगत न्यूज



कोणत्याही टिप्पण्या नाहीत