सावद्याच्या आर्यन पाटीलची पॅरिसमधील ‘इकोल दी बोझा आर्टस्’ कॉलेजसाठी निवड; शिल्पकलेत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार
सावद्याच्या आर्यन पाटीलची पॅरिसमधील ‘इकोल दी बोझा आर्टस्’ कॉलेजसाठी निवड; शिल्पकलेत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार
लेवा जगत न्यूज, सावदा –सावदा तालुका रावेर येथील आर्यन नंदकिशोर पाटील याची पॅरिस (फ्रान्स) येथील नामांकित ‘Ecole des Beaux Arts (इकोल दी बोझा आर्टस्)’ या महाविद्यालयासाठी निवड झाली असून, तो पुढील शिक्षणासाठी फ्रान्सला जाणार आहे. ही निवड बडोदा येथील श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या फाईन आर्ट्स फॅकल्टी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत झाली आहे.
या उपक्रमांतर्गत दरवर्षी विद्यापीठातून एका विद्यार्थ्याची निवड करून त्याला परदेशात शिक्षणाची संधी दिली जाते. यंदा ही संधी आर्यनला मिळाली असून, १२ जानेवारी ते २७ जून २०२६ या कालावधीत तो पॅरिस येथे शिल्पकलेचे शिक्षण घेणार आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत आर्यनला त्याच्या कलाकृतींचे वैयक्तिक प्रदर्शन करण्याचीही नामांकित संधी मिळणार आहे.
आर्यन हा सावदा येथील रहिवासी असून, सावदा पालिका संचलित श्री. आ. गं. हायस्कूल व श्री. ना. गो. पाटील ज्यु. कॉलेज येथे कार्यरत असलेले कलाशिक्षक श्री. नंदू पाटील सर यांचा मुलगा आहे. बालपणापासूनच कलेची आवड असलेल्या आर्यनने विविध कलाप्रदर्शनांत सहभाग घेऊन आपली वेगळी छाप पाडली आहे.
या यशामुळे सावदा परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आर्यनवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कलाजगतात उंच भरारी घेणाऱ्या या होतकरू युवा कलाकाराला लेवा जगत न्यूजतर्फे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत