"फैजपूरमध्ये भागवतकथारुपी आध्यात्मिक महाकुंभाची भक्तिमय सांगता; संतांच्या वचनामृतांनी भक्तगण भारावले"
"फैजपूरमध्ये भागवतकथारुपी आध्यात्मिक महाकुंभाची भक्तिमय सांगता; संतांच्या वचनामृतांनी भक्तगण भारावले"
लेवाजगत न्यूज फैजपूर (प्रतिनिधी):फैजपूर येथील सुप्रसिद्ध श्री खंडोबा वाडी देवस्थानात साकेतवासी ब्रह्मचारी महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रीमद् भागवत संगीतमय कथारुपी महाकुंभ यशस्वीरीत्या पार पडला. या महाकुंभाचे पहिले स्नान संतदर्शन व अभिर्वचनाच्या माध्यमातून पार पडल्याची गौरवोद्गार परमपूज्य श्री रामकिशोरदासजी महाराज शास्त्री (अध्यक्ष, दिगंबर आखाडा, नाशिक) यांनी व्यक्त केले.
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित या अध्यात्मिक महोत्सवात आंतरराष्ट्रीय धर्माचार्य देवमोरारी बापू, महंत श्री विष्णुदासजी महाराज (सप्तशृंगी गड), महंत श्री दिव्यचैतन्यजी महाराज (वृंदावन धाम पाल), महंत श्रीकृष्णगिरीजी महाराज (सोमवार मढी सावदा), शास्त्री मानेकरबाबा (सावदा), महंत स्वरूपानंदजी महाराज (डोंगरदे) शास्त्री स्वामी अनंत प्रकाश दासजी(उपाध्यक्ष स्वामीनारायण गुरुकुल सावदा)आदी संत-महंतांची व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात ह. भ. प. श्री भरत महाराज म्हैसवाडीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर महंत घनश्यामदासजी यांच्या प्रतिमेला पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कथा महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य रामकिशोरदासजी महाराज शास्त्री होते. त्यांनी आपल्या अभिर्वचनात सांगितले की, "साधुसंत हे कमलपुष्पा सारखे असतात. ते जिथे जातात, तिथे पावित्र्य निर्माण करतात. जाकी रही भावना जैसी या उक्तीनुसार कर्मावर आधारित फळ मिळते." यावेळी त्यांनी श्री खंडोबा वाडी देवस्थानचे उत्तराधिकारी पवनकुमार दासजी यांना महामंडलेश्वर ही पदवी प्राप्त झाल्याची घोषणाही केली.
महाकुंभ प्रसंगी उपस्थित संत महंतांनी आनंदी जीवनशैली व मोक्षप्राप्तीचा मार्ग सोप्या शब्दांत भक्तांपुढे मांडला. सात दिवस चाललेल्या श्रीमद् भागवत कथेचे वक्तृत्व ह. भ. प. श्री भरत महाराज म्हैसवाडीकर यांनी आपल्या मधुर स्वरांतून केले. यजमान म्हणून श्री सिताराम दगडू नारखेडे (मुख्य यजमान) तर दिवसाचे यजमान श्री दोधू बोरोले, डॉ लोकेश नेहते, श्री अशोक पाटील, श्री अमोल महाजन, श्री नरेंद्र चौधरी व इतर मान्यवर होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केयूर टेंट हाऊस फैजपूर, सिताराम बाबा आश्रम मंडळ भुसावळ, जय अंबिका लाइटिंग, जय मल्हार मित्र मंडळ फैजपूर यांच्यासह पंचक्रोशीतील भक्तमंडळांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन महामंडलेश्वर पवनकुमारदासजी यांनी केले.
या समारंभाच्या यशस्वीतेसाठी गादीपती महामंडलेश्वर महंत पुरुषोत्तम दासजी महाराज, पुजारी श्रीराम मनोहर दासजी व उत्तराधिकारी पवनकुमार दासजी यांचे विशेष योगदान होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत