Contact Banner

संसदेत 'जय महाराष्ट्र'चा नारा -निशिकांत दुबेंना मराठी खासदारांचा रोखठोक जाब!

 

'Jai Maharashtra' slogan in Parliament - Nishikant Dubey gets a stern reply from Marathi MPs!


संसदेत 'जय महाराष्ट्र'चा नारा -निशिकांत दुबेंना मराठी खासदारांचा रोखठोक जाब!

नवी दिल्ली, २४ जुलै — हिंदी सक्तीच्या वादात मराठी जनतेविरोधात वादग्रस्त विधान करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना बुधवारी संसदभवनाच्या लॉबीत थेट घेराव घालून मराठी महिला खासदारांनी चोख प्रत्युत्तर दिले. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देत संसद परिसरात मराठी स्वाभिमानाचा आवाज बुलंद करण्यात आला.

राज्यात सध्या परप्रांतीयांच्या मराठी विरोधी वक्तव्यांमुळे वातावरण तापलेले असताना, दुबे यांनी “राज ठाकरे बिहारला आले तर पटक-पटक के मारेंगे” असा अवमानजनक इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर दुबे यांचा संसद लॉबीत पाठपुरावा केला.

“तुमची ही भाषा अर्वाच्य आहे! मराठी लोकांना मारण्याची धमकी कशी देता? तुमचं वागणं आम्ही खपवून घेणार नाही!” अशा संतप्त शब्दांत गायकवाड यांनी दुबेंना फटकारलं. यावेळी लॉबीत जोरदार *‘जय महाराष्ट्र’*च्या घोषणांनी वातावरण भारून गेलं. या घोषणांनी संसद लॉबी दणाणून गेली आणि दुबेंना मागच्या दाराने माघार घ्यावी लागली.

या गदारोळाच्या वेळी इतर मराठी खासदारही लॉबीत हजर झाले आणि त्यांनीही आपला रोष व्यक्त केला. काही वेळाने दुबे जेव्हा कँटिनकडे निघाले, तेव्हा केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनीही त्यांना विचारणा केली. मात्र दुबे काहीच न बोलता तिथून निघून गेले.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या :

“दुबे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेला आव्हान दिलं आहे. आम्ही गप्प बसणार नाही. संसदेत मराठीचा आवाज बुलंद करत राहू.”

हे संपूर्ण नाट्य काही मिनिटांत घडलं, पण त्याचे पडसाद संपूर्ण संसद परिसरात उमटले. विशेष म्हणजे, यावेळी महायुतीच्या काही मराठी खासदारांच्या चेहऱ्यावरही मंद स्मित दिसून आलं.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.