भाजप आमदारांच्या आरोपांना प्रत्युत्तर-खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल : “माझ्या विकासकामांची यादी भली मोठी, तुमची आहे तरी किती?”
खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल : “माझ्या विकासकामांची यादी भली मोठी, तुमची आहे तरी किती?”
लेवा जगत न्यूज, जळगाव –
जामनेर येथील भाजप कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच, शनिवारी (दि. २६ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेतील गटनेते आ. एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि भाजप आमदारांवर घणाघात केला.
नार्को टेस्टची मागणी, मंत्र्यांची नावे बाहेर येण्याची भीती
“जामनेर येथील भाजप कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्यावर मुंबई व पुणे येथे गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. या कथित 'हनी ट्रॅप' प्रकरणाचे सत्य समोर यावे यासाठी त्याची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. पण सत्ताधाऱ्यांनी ही मागणी मनावर घेतलेली नाही. कारण नार्को टेस्टमधून मंत्र्यांची नावे उघड होण्याची भीती आहे,” असा स्पष्ट आरोप खडसेंनी केला.
मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सीबीआयची मागणी
आपल्या मुलगा निखिल खडसेच्या मृत्यूबाबत मंत्री गिरीश महाजन शंका उपस्थित करतात, तर “हिम्मत असेल तर त्यांनी सीबीआय चौकशी करून दाखवावी,” असे आव्हानही खडसेंनी दिले. या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना भावनिक आणि राजकीय दोन्ही पातळीवर उत्तर दिले.
भाजप आमदारांच्या आरोपांना प्रत्युत्तर
शुक्रवारी (दि. २५ जुलै) जिल्ह्यातील भाजपचे चारही आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर गंभीर आरोप केले होते. यावर प्रत्युत्तर देताना खडसेंनी विचारले की, “प्रफुल्ल लोढा जर खरोखरच गैरवर्तन करणारा असेल, तर गिरीश महाजन यांनी त्याला भाजपमध्ये प्रवेश का दिला? पक्षात घेताना तो ‘चांगला कार्यकर्ता’ होता आणि आता तो ‘गुन्हेगार’ कसा झाला?”
“माझी कामगिरी ठळक, तुमची दाखवा!”
“गिरीश महाजन माझ्या संपत्तीबाबत प्रश्न उपस्थित करतात. पण एक शिक्षकाचा मुलगा, त्यांच्या पेन्शनवर वाढलेला माणूस म्हणून माझ्या उत्पन्नाबाबत पारदर्शकता ठेवली आहे. मी माझ्या काळात जिल्ह्यात धरणे, शैक्षणिक संस्था, पायाभूत सुविधा अशा अनेक विकासकामांची गंगा आणली. महाजन यांनी त्यांच्या काळात काय भरीव विकासकामे केली ते दाखवून द्यावीत,” असे आव्हानही खडसेंनी दिले.
जावयावर खोटे गुन्हे, सूडबुद्धीची कारवाई
खडसेंनी सांगितले की, “गिरीश महाजन यांनी वैयक्तिक आकसातून माझ्या जावयावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला तुरुंगात डांबले. प्रफुल्ल लोढा प्रकरणात सूडबुद्धीने आमच्या कुटुंबावर अन्याय केला जात आहे.”
विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांची उपरोधिक टीका
यासोबतच खडसेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विधानसभेतला उल्लेख करत सांगितले की, “अंकल... अंकल... अंकल काकीला सांगेन…” या शब्दांत त्यांनी गिरीश महाजन यांना उपरोधिक टोला लगावला होता. हे विधान देखील या प्रकरणात अंतर्गत नाराजीचा संकेत देणारे आहे.
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, दिलीप खोडपे, संग्राम सूर्यवंशी, अशोक लाडवंजारी, सुनील माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
—
लेवा जगत न्यूज
(प्रतिनिधी – जळगाव)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत