सावदा पालिकेच्या जॅकवेलवर भीषण अपघात; विद्युत शॉकने दोन मजूर गंभीर जखमी
तापी नदीतील बॅक वॉटरमधील जॅकवेलवर दोन ठेकेदारी मजूरांना विद्युत शॉक; पाणीपुरवठा योजनेतील सुरक्षेच्या त्रुटींवर गंभीर प्रश्न
लेवाजगत न्यूज, सावदा-
सावदा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तापी नदीच्या बॅक वॉटरमधील पात्रात उभारण्यात आलेल्या जॅकवेलवर शुक्रवारी सध्याकाळी साडेपाचच्या सुमारास देखभाल आणि दुरुस्ती दरम्यान मोठा अपघात घडला. या दुर्घटनेत दोन ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या मजुर कर्मचारी यांना विद्युत शॉक बसून ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेने पाणीपुरवठा योजनेतील सुरक्षेच्या नियमांबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.
जॅकवेलवर नेहमीप्रमाणे देखभाल व दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळे पृथ्वी भंगाळे आणि पंकज बेंडाळे या दोन कर्मचारी मजुरांना तीव्र विद्युत शॉक बसला. शॉकमुळे ते जागेवरच बेशुद्ध झाले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना सावदा येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी पुढील काही तास अत्यंत नाजूक मानले जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिका प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, जॅकवेलमध्ये काम सुरू असताना विजेचा पुरवठा पूर्णपणे बंद न करता काम सुरू ठेवण्यात आलं होतं. तसेच सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणांचीही कमतरता होती, ही गंभीर निष्काळजीपणाची बाब समोर आली आहे.
या मजुरांची नेमणूक आस्था या संस्थेमार्फत ठेकेदारी पद्धतीने करण्यात आली होती. संबंधित संस्थेच्या वतीने दरमहा मजुरांच्या पगारातून पाचशे रुपयांची कपात केली जाते. तरीही त्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा किंवा अपघात विमा दिला जात नाही, अशी कामगारांची तक्रार आहे. यापूर्वीही एका मजुराचे मोठे ऑपरेशन झाले असून, त्या वेळी ठेकेदाराने कोणतीही जबाबदारी घेतली नव्हती, हे विशेष.
या घटनेनंतर नगरपालिका प्रशासनाने जखमी मजुरांच्या उपचारासाठी तत्काळ मदत केली असून, वैद्यकीय खर्चाची जबाबदारीही स्वीकारली आहे. मात्र या अपघातामुळे संपूर्ण यंत्रणेतील निष्काळजीपणा, ठेकेदाराच्या जबाबदारीची मर्यादा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे पालन या मुद्द्यांवर नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ही दुर्घटना केवळ एक अपघात न राहता, संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर आणि मजुरांच्या सुरक्षेच्या दुर्लक्षित व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरत आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काटेकोर सुरक्षा उपाययोजना केव्हा अमलात येणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत