मुख्याध्यापिका आणि लिपिक ३६ हजारांची लाच घेताना अँटी करप्शनच्या सापळ्यात रंगेहात पकडले!
मुख्याध्यापिका आणि लिपिक ३६ हजारांची लाच घेताना अँटी करप्शनच्या सापळ्यात रंगेहात पकडले!
लेवा जगत न्यूज, सावदा – रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात मोठा लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (वय ५७, रा. चिनावल रोड, खिरोदा) आणि कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (वय २७, रा. उदळी, ता. रावेर) यांना ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे अँटी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात व शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रसंगीची पार्श्वभूमी – "प्रसूती रजा मंजुरीसाठी लाच"
या प्रकरणातील तक्रारदार हे ६१ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांचे कुटुंबही शिक्षणक्षेत्राशी संबंधित आहे. त्यांची स्नुषा धनाजी नाना विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. २ जून रोजी प्रसुती रजेसाठी अर्ज दिल्यानंतर, मुख्याध्यापिकेकडून प्रती महिना ५ हजार रुपयांप्रमाणे सहा महिन्यांचे एकूण ३० हजार रुपये लाच मागण्यात आली. नंतर ही रक्कम वाढवून ३६ हजार रुपये करण्यात आली.
तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन विभागात तक्रार दाखल केली. ७ जुलै रोजी दुपारी सापळा रचून, कनिष्ठ लिपिक लाच स्वीकारताना पकडला गेला. यानंतर मुख्याध्यापिकेलाही तात्काळ अटक करण्यात आली.
कारवाईचे नेतृत्व
ही सर्जनशील आणि अचूक कारवाई अँटी करप्शन ब्युरो, धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या प्रकरणामुळे शैक्षणिक संस्थांमधील भ्रष्टाचाराच्या प्रकारांबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत