Contact Banner

सेऊल, दक्षिण कोरिया येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांची निवड

Prof. Dr. Sunil Neve selected to participate in International Conference in Seoul, South Korea


सेऊल, दक्षिण कोरिया येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांची निवड

लेवाजगत न्यूज भालोद :सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे हे १२ जुलै ते १६ जुलै २०२५ दरम्यान दक्षिण कोरियातील सेऊल येथे होणाऱ्या पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेसाठी रवाना झाले आहेत.

या परिषदेमध्ये "दक्षिण आशियातील राजकीय ध्रुवीकरण: सध्याच्या परिस्थितीत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे तुलनात्मक विश्लेषण" या विषयावर प्रा. डॉ. नेवे यांचा शोधनिबंध सादर केला जाणार आहे. जगभरातील राज्यशास्त्र विषयाचे संशोधक आणि अभ्यासक या परिषदेमध्ये सहभागी होत असून, ही विद्वत्तापूर्ण चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे.

प्रा. नेवे यांनी आपल्या शोधनिबंधात दक्षिण आशियामधील राजकीय ध्रुवीकरणाचे स्वरूप, त्याची कारणे, परिणाम आणि उपाययोजना यांचे सखोल विश्लेषण केले आहे. भारतात वाढते धार्मिक ध्रुवीकरण, सोशल मीडियावरून पसरवली जाणारी चुकीची माहिती आणि राजकीय पक्षांतील वाढती दरी यांचा वेध घेतला आहे. पाकिस्तानमधील लष्करी हस्तक्षेप, बांगलादेशमधील राजकीय हिंसाचार आणि निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता या बाबींचाही त्यांनी अभ्यासपूर्ण ऊहापोह केला आहे.





त्यांच्या म्हणण्यानुसार, या तीनही देशांतील ध्रुवीकरणाचे घटक भिन्न असले तरी त्याचे परिणाम लोकशाही व्यवस्थेवर सारखेच घातक आहेत. संवादास चालना देणे, लोकशाही संस्थांना बळकट करणे आणि सामाजिक-आर्थिक विषमतेवर मात करणे हे त्यावरील उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारताच्या संदर्भात धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार आणि संविधानाच्या माध्यमातून सामाजिक लोकशाहीला दिलेले स्थान हे ध्रुवीकरणावर मात करण्याचे आदर्श उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये धर्माधिष्ठित राष्ट्रनिर्मितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडेही त्यांनी अभ्यासपूर्ण लक्ष वेधले आहे.

१५ जुलै २०२५ रोजी प्रा. नेवे यांचा शोधनिबंध या आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडण्यात येणार असून, या गौरवाच्या निमित्ताने त्यांनी संस्थेचे तसेच देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.