पुणे हादरलं :२५ वर्षीय तरुणीवर घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून बलात्कार
पुणे हादरलं : २५ वर्षीय तरुणीवर घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून बलात्कार
लेवाजगत न्यूज पुणे :– शहरातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून एका २५ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रकारामुळे पुणे हादरले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेसातच्या सुमारास आरोपी डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत सोसायटीत शिरला. पीडितेच्या घरी जाऊन 'तुमचं कुरिअर आलं आहे' असे सांगत तिच्या सह्या घेण्याचा बनाव केला. पीडितेने हे कुरिअर आपले नसल्याचे स्पष्ट सांगितल्यानंतरही आरोपीने सही करावी लागेल, असा आग्रह केला.
त्या वेळी तरुणीने सेफ्टी डोअर उघडताच आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला आणि बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर आरोपीने पीडितेच्या मोबाईलमधून तिच्यासोबत सेल्फी काढली आणि ‘परत येईल’ असे लिहून ठेवले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या गंभीर घटनेची नोंद होताच पुणे पोलिसांनी तपासाला गती दिली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत सापडेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ही घटना सुरक्षित समजल्या जाणाऱ्या घराच्या चार भिंतींमधील सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा इशारा देणारी ठरत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत