डॉक्टर्स डे निमित्त डॉ. रवींद्र भोळे यांचा जाहीर सत्कार - पद्मश्री पुरस्काराची कार्यकर्त्यांकडून मागणी
डॉक्टर्स डे निमित्त डॉ. रवींद्र भोळे यांचा जाहीर सत्कार - पद्मश्री पुरस्काराची कार्यकर्त्यांकडून मागणी
लेवाजगत न्यूज उरुळी कांचन (प्रतिनिधी): सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय आणि आध्यात्मिक सेवेसह निराधारांसाठी समर्पित भावनेने काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार आणि अपंग सेवक ह.भ.प. डॉ. रवींद्र भोळे यांचा राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने येथे जाहीर सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य हे अनुकरणीय असून, अशा व्यक्तिमत्त्वास भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमात दैनिक ‘सकाळ’च्या प्रतिनिधी आणि पूर्व हवेली प्रमुख सुवर्णा कांचन यांनी सांगितले की, “ज्ञान-विज्ञानाला अध्यात्माची जोड हवी. डॉ. रवींद्र भोळे हे निष्काम कर्मयोगाच्या आधारे विविध क्षेत्रांत समर्पित भावनेने कार्यरत आहेत.”
शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष महंत गोपाळ व्यास कपाटे यांनी म्हटले, “कोरोना काळात डॉ. भोळे महाराजांनी रात्रंदिवस अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा पुरवली. तसेच मराठवाडा भूकंपातही त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. त्यांच्या आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून ते गरीब आणि दुर्बल घटकांसाठी सेवाकार्य करत आहेत.”
गेली ३५ वर्षे निरपेक्ष भावनेने सेवा देणाऱ्या डॉ. भोळे यांनी पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत निष्काम कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या या व्यक्तिमत्त्वाला केंद्र सरकारकडून ‘पद्मश्री’ सन्मान मिळावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्याला दैनिक केसरीचे पत्रकार अमोल भोसले, ज्येष्ठ पत्रकार सुनील तुपे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत