आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली रावेर मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक
आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली रावेर मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक
लेवा जगत न्यूज रावेर- मतदारसंघातील शासकीय यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये महसूल, महावितरण, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, नगरपरिषद, ग्रामविकास आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महसूल विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, घरकुल, शेती मोजणी, रेशन दुकान यासह विविध योजनांची आकडेवारी सादर करण्यात आली. नगरपरिषदांच्या स्वच्छता मोहिम, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्त्यांची स्थिती आणि बचत गट प्रभाग संघ कार्यालयाच्या कामकाजावरही सविस्तर चर्चा झाली.
महावितरण विभागाकडून सबस्टेशन उभारणी, सौरऊर्जा प्रकल्प राबविणे व वीजपुरवठा अडचणींवर चर्चा करण्यात आली. पोलीस विभागासोबत कायदा-सुव्यवस्था आणि अवैध गोतस्करीसारख्या गंभीर विषयांवरही आढावा घेण्यात आला.
चारमाळी येथील आदिवासी वस्तीच्या विकासासाठी सुरू असलेल्या योजनांवर प्रांताधिकारी आणि आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा करण्यात आली. याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने मतदारसंघातील रस्त्यांची सद्यस्थिती, दिरंगाई व तांत्रिक अडचणींबाबत विचारमंथन झाले.
या बैठकीला प्रांताधिकारी बबन काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, सावदा विभागाचे अभियंता गणेश महाजन, यावल गटविकास अधिकारी मंजुषा गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जहांगीर तडवी, जिल्हा परिषदेचे अभियंता रवींद्र इंगळे तसेच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, विशाल जैस्वाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, विशाल पाटील, हरिदास बोचरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून लोकांच्या समस्या वेळेत सोडवण्याचे आणि विकासकामांमध्ये गती आणण्याचे स्पष्ट निर्देश दिले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत