Contact Banner

सावदा ग्रामीण रुग्णालय सेवाशून्य; पंतप्रधानांचे उद्घाटन असूनही टेक्निशियन, १०८ सेवा आणि सुविधा अपूर्णच – जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनालाही दोन महिने उलटले

 

Savda Rural Hospital is without services; facilities are incomplete despite the inauguration by the Prime Minister


सावदा ग्रामीण रुग्णालय सेवाशून्य; पंतप्रधानांचे उद्घाटन असूनही टेक्निशियन, १०८ सेवा आणि सुविधा अपूर्णच – जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनालाही दोन महिने  उलटले


 लेवाजगत न्यूज सावदा -सावदा जिल्हा जळगांव शहरातील ग्रामीण रुग्णालय हे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र असून, त्याचे उद्घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, तसेच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले होते. मात्र या भव्य उद्घाटनाला दोन वर्षे उलटून गेली तरी रुग्णालयात अजूनही मूलभूत सेवा आणि कर्मचारी उपलब्ध नाहीत.


 जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच


सुमारे दोन महिने पूर्वी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सावदा नगरपरिषदेस भेट दिली असताना, पत्रकारांनी टेक्निशियन नेमणुकीसंदर्भात थेट प्रश्न विचारला होता. यावर “टेक्निशियन मिळताच लवकरच नेमणूक केली जाईल” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र या आश्वासनाला महिने उलटून गेले तरी आजतागायत कोणतीही नेमणूक झालेली नाही. परिणामी एक्स-रे, लॅब, सोनोग्राफी यांसारख्या मूलभूत सुविधा अजूनही बंदच आहेत.

Savda Rural Hospital is without services; facilities are incomplete despite the inauguration by the Prime Minister


तांत्रिक मनुष्यबळाचा अभाव गंभीर


रुग्णालयात सोनोग्राफी आणि एक्स-रे मशीन उपलब्ध असले तरी,एक्स-रे टेक्निशियन,लॅब टेक्निशियन सोनोग्राफी टेक्निशियन हे कर्मचारीच उपलब्ध नसल्याने यंत्रसामग्री वापरात येऊ शकत नाही. याशिवाय, यंत्रांसाठी आवश्यक वीज जोडणीचे काम देखील अपूर्ण आहे.


कार्यरत डॉक्टर, पण सेवा अडचणीत


सध्या रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत .डॉ.प्रविण काकडे (स्त्रीरोगतज्ज्ञ),डॉ.सचिन पाटील (अस्थिरोगतज्ज्ञ),डॉ.निकिता भिरुड (जनरल फिजिशियन)हे डॉक्टर आपल्या पातळीवर सेवा देत असले तरी, टेक्निशियन आणि तांत्रिक सुविधा नसल्याने उपचारात अडथळा येतो.

Savda Rural Hospital is without services; facilities are incomplete despite the inauguration by the Prime Minister



 प्रशासकीय हालचाली सुरू –पण प्रत्यक्ष बदल नाही.


जळगाव येथील जिल्हा शल्यचिकित्सकांनी मनुष्यबळासाठी वरिष्ठांना पत्रव्यवहार केला असून, नाशिक विभागीय आरोग्य कार्यालयाकडून सावदा रुग्णालयात कर्मचारी देण्यास मंजुरी मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. मात्र प्रत्यक्ष नेमणूक अद्याप न झाल्याने रुग्णसेवा सुरू होऊ शकलेली नाही.


 नावाचा प्रश्न,१०८ सेवा आणि रात्र सेवा प्रलंबित


“छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय” असे नामकरणाचा ठराव नगरपरिषदेकडून पारित, पण अद्याप शासन आदेश नाही.१०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा उपलब्ध नाही.डॉक्टर व कर्मचारी यांचे साठी निवास असूनही कोणीही प्रत्यक्ष राहत नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी सेवा अडथळ्याने दिली जाते.


ऑपरेशन थेटर कार्यान्वित नाही-

४२ गावांचे एकमेव आधारवड, पण...


सावदा शहरासह परिसरातील ४२ गावांतील नागरिक या रुग्णालयावर अवलंबून आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू नसल्याने त्यांना खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. सामान्य आणि गरीब रुग्णांच्या खिशावर याचा मोठा परिणाम होत आहे.

   नागरिकांची संतप्त मागणी

 “जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आश्वासन दिल्यानंतरही मनुष्यबळ उपलब्ध न होणे हे प्रशासनाचे अपयश आहे. तातडीने टेक्निशियन, १०८ सेवा, ऑपरेशन थेटर आणि वीज जोडणी सुरू करून रुग्णालय कार्यक्षम करावे,” अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.