अंधश्रद्धेचा अजब प्रकार : आमोदा–पिंपरूड रस्त्यावर अपघातस्थळी पूजा; प्रशासनाचे आवाहन - भीती नको, दक्षता घ्या
अंधश्रद्धेचा अजब प्रकार : आमोदा–पिंपरूड रस्त्यावर अपघातस्थळी पूजा; प्रशासनाचे आवाहन - भीती नको, दक्षता घ्या
लेवा जगत न्यूज, जळगाव –आमोदा ते पिंपरूड दरम्यानच्या रस्त्यावर गेल्या महिन्याभरात तब्बल ३० अपघात झाले होते. यामध्ये एक महिला आणि एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीसह विविध उपाययोजना केल्या. त्यानंतर गेल्या २० दिवसांत एकही अपघात झालेला नाही.
मात्र, बुधवारी रात्री या मार्गावर एक अजब प्रकार घडला. अपघातग्रस्त ठिकाणी अज्ञात व्यक्तीने लिंबू, नारळ, अगरबत्ती, कापूर इत्यादी साहित्य ठेवत पूजा केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. अमावास्येच्या निमित्ताने ही कृती अंधश्रद्धेतून केल्याची कुजबूज स्थानिकांमध्ये होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे, या रस्त्यावरील अपघातांचे मुख्य कारण तांत्रिक आणि भौगोलिक अडचणी असल्याचे स्पष्ट झाले होते. प्रशासनाने आमोदा पुलाच्या दोन्ही बाजूंना पाच ठिकाणी ‘रंबलिंग स्ट्रिप्स’ बसवल्या असून, सूचनाफलक व कठडे दुरुस्त करण्यात आले आहेत. परिणामी, ६ जुलै रोजी झालेल्या शेवटच्या ‘गणेश ट्रॅव्हल्स’ अपघातानंतर पुन्हा कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.
दरम्यान, या प्रकारावर प्रतिक्रिया देताना प्रशासनाने नागरिकांना अंधश्रद्धेच्या भ्रामक प्रभावापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. "अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे, पूजाअर्चा नव्हे," असे स्पष्ट मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत