Header Ads

Header ADS

जळगावात जनरेटर, व्हॅन व ५ मोटारसायकलींची चोरी उघडकीस;२.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Theft-of-generator,-van-and-5-motorcycles-uncovered-in-Jalgaon


जळगावात जनरेटर, व्हॅन व ५ मोटारसायकलींची चोरी उघडकीस;२.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक


लेवाजगत न्यूज जळगाव -शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गोलाणी मार्केट परिसरात १४ जुलैच्या रात्री ८.३० वाजेपासून ते १५ जुलैच्या सकाळी ९.३० या वेळेत Mighty Brothers दुकानासमोरील सार्वजनिक जागेवरून चोरट्यांनी अंदाजे ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. यात फोर्स कंपनीचा MH-19 0666 क्रमांकाचा टेम्पो (किंमत – ₹६१,०००/-) आणि किर्लोस्कर कंपनीचा ३० किलोवॅट जनरेटर (किंमत – ₹३०,०००/-) असा समावेश होता. याप्रकरणी मिलींद मुकुंद थत्ते (रा. नवीपेठ, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक कार्यरत झाले. शहरातील तसेच महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि गुप्त माहितीच्या आधारे चोरट्यांचा मागोवा घेण्यात आला. त्यातून आरोपी जामनेर, बोदवडमार्गे मलकापूर-नांदुरा दिशेने गेल्याची माहिती समोर आली.


पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर वडनेर भोईजी गावाजवळ चोरीचा टेम्पो अपघातग्रस्त स्थितीत सापडला. काही अंतरावर एका ढाब्यावर संशयित दोन तरुण आढळून आले. त्यांच्या अंगावरील जखमा व संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – मंगेश सुनिल मिस्तरी (वय २०, रा. कांचन नगर, ह.मु. शिरसोली, जळगाव) आणि यश अनिल सोनार (वय २०, रा. समता नगर, ह.मु. ओम नगर, शिरसोली, जळगाव). चौकशीत त्यांनी फक्त गोलाणी मार्केटमधील नव्हे तर इतर भागांतील चोरीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण ₹२,३६,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात जनरेटर व्हॅन, टाटा एस मालवाहतूक वाहन आणि पाच मोटारसायकलींचा समावेश आहे.


या तपासातून जळगाव शहरातील एक, जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील तीन, एमआयडीसीतील दोन व रामानंदनगर पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.


ही कामगिरी शहर गुन्हे शोध पथकातील सफौ. सुनिल पाटील, पोहेकॉ. उमेश भांडारकर, सतिश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, विरेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, पोना भगवान पाटील, पोकॉ अमोल ठाकुर, भगवान मोरे, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार तसेच नेत्रम येथील पोकॉ. पंकज खडसे आणि मुबारक देशमुख यांनी केली.


पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यशस्वीरीत्या पार पडला असून शहर पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.