Contact Banner

चाळीसगाव येथील प्रकरण : गुन्हा नोंदवण्याचा विषय तूर्त अधांतरीच, 'मणियार बंधूंना चौकशीला बोलावले जाईल'

 

The matter of registering a crime in Chalisgaon is being investigated immediately, and the Maniar brothers will be called for questioning.

अखेर 'एफआयआर' दाखल करायला पीडिता आलीच नाही

चाळीसगाव येथील प्रकरण : गुन्हा नोंदवण्याचा विषय तूर्त अधांतरीच, 'मणियार बंधूंना चौकशीला बोलावले जाईल'

लेवाजगत न्यूज  जळगाव

चाळीसगाव येथील गाजलेल्या प्रकरणात अखेर एफआयआर नोंदवण्यासाठी संबंधित पीडित महिला पोलिस ठाण्यात आलीच नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याचा विषय सध्या अधांतरी राहिला आहे.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, स्थानिक गुन्हा शाखेच्या निरीक्षकाने एका महिलेचे शोषण केले असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पीडितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवून "मी उद्या येऊन एफआयआर देईन" अशी लेखी नोंद केली होती. मात्र, शनिवारी ती तक्रार दाखल करण्यासाठी हजर झालीच नाही.

दरम्यान, पीडितेसोबत नेमण्यात आलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला तिने सकाळी फोन करून "मला तक्रार द्यायची नाही" असे सांगितले. तरीदेखील "दोन दिवसांत पोलिस ठाण्यात येऊन स्वतंत्र जबाब देईन" असेही तिने कळवले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या प्रकरणाशी संबंधित स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून ते शनिवारपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

दरम्यान, पाटील यांना मदत करणारे आयुष व पीयूष मणियार या दोघा भावांकडे शस्त्र परवाने असून ते नेमका कोणता व्यवसाय करतात, असा प्रश्न आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला होता. या दोघांना शनिवारी चौकशीसाठी एमआयडीसी पोलिसांनी बोलावण्याचे ठरवले होते. मात्र, ते जळगावात नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आल्याने लवकरच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी स्पष्ट केले.

"पीडित महिलेने दिलेला सुरुवातीचा जबाब पोलिसांकडे राखून ठेवण्यात आला आहे. ती लेखी स्वरूपात 'मला तक्रार द्यायची नाही' असा जबाब देईपर्यंत तो जबाब कायम ठेवण्यात येईल."

  • बबन आव्हाड, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी, जळगाव


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.