जळगावात पुन्हा अपघात! चार बहिणींचा एकुलता भाऊ अपघातात ठार
जळगावात पुन्हा अपघात! चार बहिणींचा एकुलता भाऊ अपघातात ठार
लेवाजगत न्यूज | जळगाव
जळगाव जिल्ह्यात अपघातांच्या मालिका सुरूच आहेत. अशातच एका हृदयद्रावक अपघातात चार बहिणींचा एकुलता भाऊ असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उमाळा गावाजवळ शनिवारी दुपारी दुचाकी व काँक्रीट मिक्सर यांच्यात झालेल्या भीषण धडकेत २३ वर्षीय साहिल मोहम्मद खाटीक याचा जागीच मृत्यू झाला.
मासे घेण्यासाठी जात असताना मृत्यूचं आलं वळण
साहिल खाटीक (वय २३, रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) हा तरुण आपल्या वडिलांसोबत महामार्गालगत मासे विक्रीचा व्यवसाय करायचा. शनिवारी तो दुचाकी (MH-19-EQ-3132)ने नेरी (ता. जामनेर) येथे मासे घेण्यासाठी निघाला होता. मात्र उमाळा गावाजवळ भरधाव काँक्रीट मिक्सर (MH-15-GV-5630)ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
जागीच झाला मृत्यू, दुचाकीचा अक्षरशः चुराडा
अपघात एवढा भीषण होता की साहिलच्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात साहिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर; तांबापुरा परिसरात शोककळा
साहिल खाटीक याच्या पश्चात आई-वडील व चार बहिणी असा परिवार आहे. तो घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण तांबापुरा परिसरात शोककळा पसरली आहे. रुग्णालयात कुटुंबीयांनी केलेला आक्रोश अंतःकरण हेलावणारा होता.
पोलीसांनी वाहन घेतले ताब्यात, पुढील तपास सुरू
या प्रकरणी MIDC पोलिसांनी अपघातग्रस्त काँक्रीट मिक्सर ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत