सावदा शिवारात कट्टा दाखवून मोटारसायकलस्वारास १.५० लाख लुटले – परिसरात खळबळ
सावदा शिवारात कट्टा दाखवून मोटारसायकलस्वारास १.५० लाख लुटले – परिसरात खळबळ
सावदा लेवाजगत प्रतिनिधी :
सावदा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी गावठी कट्टा रोखून मोटारसायकलस्वारावर जीवघेणा हल्ला करत १.५० लाख रुपयांची रोकड लुटल्याची सनसनाटी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फिर्यादी साजिद शेख अकबर (वय ३४, रिक्षा चालक रा. मुस्लिम कॉलनी, खडकारोड, भुसावळ) हा आपल्या मित्रासह अॅक्सेस स्कुटीवरून निभोरी येथून टायरचे पेमेंट म्हणून घेतलेली १.५० लाख रुपये रक्कम घेऊन भुसावळकडे परत जात होता. दिनांक २७ रोज बुधवार सायंकाळी साडेचारच्या सुमारास सावदा ते पिंपरुड रस्त्यावरील स्मशानभूमी जवळील सार्वजनिक ठिकाणी ही घटना घडली.
दरम्यान, आरोपी अज्जु डॉन बुरहानपुरवाला, तौसीफ (पूर्ण नाव अज्ञात) व त्यांचे तीन साथीदार हे पांढऱ्या रंगाच्या तवेरा कारने आले. त्यांनी स्कुटीसमोर गाडी लावून मार्ग अडवला. कट्टा दाखवत फिर्यादीस पैशांची मागणी केली. फिर्यादीने विरोध दर्शविताच "भडवे जान से मरना है क्या" अशी शिवीगाळ करून आरोपींनी त्याला धमकावले. आरोपी क्रमांक १ ने फिर्यादीस मोटारसायकलवरून खाली ओढून छातीत लाथ मारली व स्कुटीच्या डिक्कीत ठेवलेली १.५० लाख रुपये रोख रक्कम काढून सर्व आरोपी पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विशाल पाटील व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा ३५१(२)(३), ३५२ भादंवि सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांचा शोधमोहीम सुरू
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे तपास करत असून दाखल अधिकारी पो.उपनिरीक्षक राहुल सानप आहेत. आरोपींच्या शोधासाठी सावदा, भुसावळ, मुक्ताईनगर परिसरात नाकाबंदी लावण्यात आली आहे. पोलिसांनी काही संशयितांवर लक्ष केंद्रीत केले असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेमुळे परिसरात दहशत
गावठी कट्टा दाखवून दिवसाढवळ्या सार्वजनिक रस्त्यावर अशी लूट घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून आरोपींचा मागोवा घेण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत