Contact Banner

सावदा येथे भगवान श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन २९ ऑगस्ट रोजी भव्य उत्साहात

 

Savada-here-Lord-Shri-Chakradhar-Swami-incarnation-day-29-August-Roji-with-great enthusiasm

सावदा येथे भगवान श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन २९ ऑगस्ट रोजी भव्य उत्साहात

लेवाजगत न्यूज सावदा :-
भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतरण दिन उत्सव यावर्षी २९ ऑगस्ट रोजी सावदा येथे मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होणार आहे. भगवान श्रीचक्रधर स्वामींचा जनहितवादी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर व बोदवड या पंचतालुक्याच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या अवतरण दिन सोहळ्याचे आयोजन सावदा व पंचक्रोशीतील चक्रधर स्वामी भक्त परिवाराच्या पुढाकाराने करण्यात आले असून, कार्यक्रमाचे ठिकाण सावदा येथील जेहरा मॅरेज हॉल निश्चित करण्यात आले आहे. या धार्मिक व सामाजिक महोत्सवाला परिसरातील भाविक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणार असल्याची अपेक्षा आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता श्री मंगलमूर्ती स्नानाने होईल. त्यानंतर सकाळी ७ वाजता श्री मंगल गीता पठण, सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ध्वजारोहण सोहळा, तर दुपारी बारा वाजता अवतरण उत्सव तथा महाआरती आयोजित करण्यात आली आहे. सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी दुपारी साडेबारा वाजता महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपाध्यकुलाचार्य महंत श्री बिडकर बाबा रनाईचे राहणार आहेत. तसेच या धार्मिक सोहळ्यास महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज (फैजपूर), रवींद्र हरणे महाराज (मुक्ताईनगर), श्याम चैतन्य महाराज (जामनेर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याचबरोबर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ तसेच जिल्ह्यातील समस्त आमदार कार्यक्रमाला उपस्थित राहून आशीर्वचन देणार आहेत.

या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सावदा येथील महानुभाव गादीपती मानेकर बाबा, प्राचार्य राजधर बाबा शास्त्री (सांगवी), आचार्य श्री चोरमागे बाबा शास्त्री (खिर्डी), आचार्य श्रीकृष्णराज बाबा शास्त्री (तांदलवाडी) व त.वैशालीताई आराध्य (भुसावळ) यांनी आवाहन केले आहे की, महानुभाव पंथातील सर्व भाविक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अवतरण महोत्सवाचा लाभ घ्यावा.

हा धार्मिक सोहळा आध्यात्मिक उन्नती, सामाजिक ऐक्य आणि जनहितवादी संदेशाचा संगम ठरणार असून, सावदा पंचक्रोशीतील भाविकांमध्ये मोठ्या उत्सुकतेचे व श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.