Contact Banner

सावदा येथे दिगंबर जैन मंदिरात पर्यूषण महापर्व उत्साहात सुरू


Paryushan Mahaparva begins with enthusiasm at Digambar Jain temple in Savda


सावदा येथे दिगंबर जैन मंदिरात पर्यूषण महापर्व उत्साहात सुरू 

सावदा (प्रतिनिधी) – जैन समाजातील सर्वात महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जाणारा पर्यूषण महापर्व यंदाही सावदा येथे मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होत आहे. दशलक्षण महापर्व निमित्ताने सावदा येथील प्राचीन दिगंबर जैन मंदिरात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


हा व्हिडीओ पण बघा-सावदा येथे पर्यूषण महापर्व जैन मंदिरात सुरू, जैन समाजातील अत्यंत पवित्र उत्सव मानला जातो. संयम, साधना, आत्मचिंतन आणि उपवास याला या दिवसांत विशेष महत्त्व असते.*
https://youtu.be/ehh53W64JdA

सावदा येथील दीडशे वर्षे जुने असलेले हे प्राचीन मंदिर सन २०१९ मध्ये परमपूज्य १०८ मुनिश्री विशेषसागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने जिर्णोद्धारानंतर नव्या भव्य आणि दिव्य रूपात उभे राहिले असून आज जैन समाजाचे श्रद्धास्थान झाले आहे. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सुरू असलेल्या पर्यूषण महापर्वात दररोज सकाळी पुरुष, महिला, तरुण व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिषेक, पूजा-अर्चा व धार्मिक विधींमध्ये सहभागी होत आहेत. भाविक सामूहिक प्रार्थना, प्रवचन, पाठमाला आणि भजनांद्वारे आपली श्रद्धा व्यक्त करत असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने निनादत आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भगवान वासुपूज्यनाथांची भव्य जलयात्रा सावदा शहरातील मुख्य चौकातून निघून पुन्हा मंदिरात येऊन संपन्न होणार आहे. त्यानंतर भगवानांची विशेष पूजा-अर्चा व महाआरती मोठ्या श्रद्धेने पार पाडली जाणार आहे.

या धार्मिक पर्वाचे आयोजन मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर दिपक सैतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून त्यांना उपाध्यक्ष ट्रस्टी देवेंद्र अन्नदाते, सचिव विमलेश जैन, ट्रस्टी योगेश जैन, ट्रस्टी अभिजित मिटकर यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच या कालावधीत मुख्यइंद्र प्रकाश जी पांडव यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

पर्यूषण महापर्व हा जैन धर्मीयांसाठी आत्मचिंतन, संयम, साधना आणि उपवासाचा काळ मानला जातो. या दहा दिवसांच्या पर्वामुळे सावदा येथील जैन समाजात भक्तिभाव, पावनता व धार्मिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

✍🏻 लेवा जगत न्यूज, सावदा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.