साडेतीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सावदा पालिका निवडणुकीची घड्याळाची टिक-टिक सुरू
सावदा पालिका निवडणुकीची धामधूम सुरू; १८ ऑगस्टला प्रभागांची प्रारूप रचना जाहीर
लेवा जगत न्यूज, सावदा :सावदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात होत असून, येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे. नागरिकांना २१ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदविण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर सुनावणी पार पडून सप्टेंबरअखेर अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे.
नगरपालिकेत १८ ते २१ ऑगस्टदरम्यान प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यावर हरकती मागविण्यात येतील. नोंदविलेल्या हरकतींवर २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होईल. त्यानंतर २ ते ८ सप्टेंबरदरम्यान प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर करण्यात येईल. अंतिम टप्प्यात २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल.
गेल्या साडेतीन वर्षांपासून सावदा पालिका निवडणुका रखडल्या होत्या. सुरुवातीला कोरोना महामारी, त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, पालिकेवर प्रशासक नियुक्त होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिल्यानंतर आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सावदा पालिकेत एकूण १० प्रभाग असून त्यातून २० सदस्य निवडून दिले जातील. त्यापैकी —
- ५ जागा ओबीसी आरक्षित असतील (त्यात ५०% महिलांसाठी)
- १ जागा अनुसूचित जमातीसाठी
- २ जागा अनुसूचित जातीसाठी
- महिलांसाठी एकूण ५० टक्के आरक्षण — म्हणजेच १० महिला सदस्य निश्चित
प्रभाग रचना व आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, याकडे राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत