HSRP नंबर प्लेटची अंतिम तारीख वाढली; आता ३० नोव्हेंबरपर्यंत संधी
HSRP नंबर प्लेटची अंतिम तारीख वाढली; आता ३० नोव्हेंबरपर्यंत संधी
लेवाजगत न्यूज मुंबई – महाराष्ट्र शासनाने राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक केले आहे. यासाठी पूर्वी १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, जुन्या वाहनमालकांकडून कमी प्रतिसाद मिळाल्याने परिवहन विभागाने ही मुदत वाढवून आता ३० नोव्हेंबर २०२५ अशी नवी अंतिम तारीख जाहीर केली आहे.
व्हिडीओ बघा -सावद्यातील प्रख्यात उद्योगपती आणि शिक्षण सम्राटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश?https://youtu.be/nequZmUpgg0
परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत केवळ २० टक्के जुन्या वाहनांवरच HSRP प्लेट बसविण्यात आली आहे. तर १० टक्के वाहनमालकांनी प्लेट बसविण्यासाठी वेळ घेऊन अपॉइंटमेंट घेतली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अजूनही ७० टक्के वाहनमालकांनी ही प्लेट बसविण्याची कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही.
HSRP बसविण्यासाठी वाहनमालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉइंटमेंट बुक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
http://transport.maharashtra.gov.in
१ डिसेंबर २०२५ पासून ज्यांच्या वाहनांवर HSRP प्लेट नसेल, अशा वाहनांवर वायुवेग पथक (फ्लाइंग स्क्वॉड) नियमांनुसार थेट कारवाई करणार आहे. मात्र, ज्यांनी ३० नोव्हेंबरपूर्वी अपॉइंटमेंट बुक केली असेल, त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही.
सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी जुन्या वाहनमालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवून कायद्याचे पालन करावे आणि कारवाई टाळावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत