व्यावसायिकावर गोळीबार; पाच आरोपी अटकेत, पिस्तूल जप्त
व्यावसायिकावर गोळीबार; पाच आरोपी अटकेत, पिस्तूल जप्त
प्रतिनिधी, यावल – 7 ऑगस्ट 2025-चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील एका व्यावसायिकावर बिअर न दिल्याच्या रागातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 10 जुलै रोजी रात्री यावल तालुक्यातील चिंचोली येथील आडगाव फाट्याजवळ घडली. जिल्हा गुन्हे शाखेच्या तपासातून या प्रकरणात राजकीय वर्चस्ववादाचा व जुना वाद कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.
व्यावसायिकावर थेट गोळीबार
प्राप्त माहितीनुसार, चिंचोली (ता. यावल) येथील आडगाव फाट्याजवळ हॉटेल रायबा नावाचे हॉटेल आहे. 10 जुलैच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण आले. त्यापैकी एक जण दुचाकीवरून खाली उतरून हॉटेल बंद करून कारने किनगावकडे निघालेल्या प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय 40, रा. पुनगाव, ह.मु. जळगाव) यांच्या दिशेने गेला. बिअर न दिल्याचा राग मनात धरून त्याच्यावर थेट दोन गोळ्या झाडण्यात आल्या. एक गोळी छातीत तर दुसरी उजव्या खांद्याजवळ लागली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद
या घटनेनंतर यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष तपास पथकांची स्थापना करण्यात आली. तांत्रिक पद्धतीने तपास करत संशयितांची साखळी उलगडली गेली. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांद्वारे संशयितांचे हालचालीचे धागेदोरे जोडले गेले.
तपासाअंती पुनगाव येथील सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर (वय 40, ह.मु. कोल्हे हिल्स, जळगाव), तसेच दर्शन रवींद्र देशमुख (वय 25, रा. अडावद), गोपाळ संतोष चव्हाण (वय 25, रा. अडावद), विनोद वसंतराव पावरा (वय 22, रा. उमर्टी) आणि सुनील सुभाष पावरा (वय 22, रा. उमर्टी) या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गोळीबारात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना 11 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जुना वाद आणि राजकीय वर्चस्ववाद कारणीभूत?
पोलिस तपासात असं आढळून आलं की, हल्लेखोर आणि प्रमोद बाविस्कर यांच्यात पूर्वीपासून राजकीय वाद व मतभेद होते. प्रमोद बाविस्कर यांचे पुनगाव परिसरात राजकीय वर्चस्व वाढू लागल्याने त्याविरुद्ध हे कटकारस्थान आखण्यात आले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्य आरोपी सरपंच असलेल्या किशोर बाविस्कर यांच्याशी याचे दुवे जोडले जात आहेत.
दरम्यान, या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याची चर्चा आहे. त्याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून लवकरच अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
तपासासाठी विशेष पथकांची मदत
या कारवाईत जिल्हा गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, हवालदार प्रीतम पाटील, यशवंत टाकळे, बबन पाटील, रवींद्र माळी, विलेश सोनवणे, मुरलीधर धनगर, प्रदीप सपकाळे आदींनी तपासात मोलाची भूमिका बजावली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत