Contact Banner

उदळी बुद्रुक शिवारात शेतात पाणी साचल्याने शेत पिकांचे नुकसान

उदळी बुद्रुक शिवारात शेतात पाणी साचल्याने शेत पिकांचे नुकसान



 

उदळी बुद्रुक परिसरात पावसाच्या पाण्यामुळे ७०–८० हेक्टर शेतपिकांचे मोठे नुकसान; 

शेतकऱ्यांची प्रशासनाला तातडीने उपाययोजनांची मागणी

सावदा प्रतिनिधी – उदळी बुद्रुक (ता. रावेर) : दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे उदळी बुद्रुक परिसरातील शेत शिवारात पाणी साचून शेतपिकांना मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे ७० ते ८० हेक्टर शेतपिकांमध्ये पाणी तुंबले असून वेळेवर पंचनामे न केल्यामुळे नुकसान प्रमाण ठरवण्यात आणि मदत मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार उदळी बुद्रुक परिसरातील नैसर्गिक नाले काही जमिनीदार किंवा शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून बंद केले आहेत; त्यामुळे पावसाचे पाणी मार्गदर्शन न होता शेतातच थांबले आणि मुळे कुजण्यास सुरुवात झाली. "गेल्या आठवडाभरापासून पाणी शेतात साचल्याने मका, केळी, कपाशी आणि उडीद–मूग यांच्या मुळे कुजत आहेत. कपाशीचा बोंड कुजल्याने येत्या हंगामातील उत्पन्नावर गंभीर परिणाम होणार आहे," असे उदळी बुद्रुक येथील शेतकरी गोविंदा सरोदे यांनी सांगितले.

शेतात पाणी थांबल्यामुळे हातमजुरी, खते आणि इतर लागणारे खर्च ऍडव्हान्स करण्यात आले होते; त्यावरून शेतकऱ्यांना आता आर्थिक संकट उद्भवले आहे. "शेतीत वेळेवर मजुरी, खते व मनुष्यबळ खर्च करून पिके वाढवली आहेत; परंतु मानवनिर्मित अतिक्रमणामुळे आणि नुसत्या नैसर्गिक आपत्तीने आम्ही मेटाकोटीस आलो आहोत. त्वरित नाले मोकळे करावेत आणि पाणी बाहेर काढण्यासाठी व्यवस्था करावी,” अशी मागणी उदळी बुद्रुक येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केली.

स्थानिक प्रशासनाकडेही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा आरोप आहे की मंडळाचे अधिकारी व महसूल सहाय्यक शेताकडे फिरकण्यात उदासीन आहेत. "उदळी बुद्रुक हे सावदा मंडळ अधिकाऱ्यांच्या कक्षेत असूनदेखील महसूल सहाय्यक गावात क्वचितच येतात; आम्ही अनेकदा तक्रारी केल्या पण अद्याप प्रत्यक्ष पंचनामे किंवा उपाययोजना झाली नाही," असे शेतकऱ्यांनी म्हटले. तहसीलदारांनी घटनास्थळी येऊन पंचनामे करून नुकसानाची शहानिशा करावी, अशी त्यांची मागणी आहे.

नैसर्गिक नाले अतिक्रमणामुळे बंद झाल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे. पारंपरिक नाले मोकळे न केल्यास भविष्यात पाण्याचा साठा वारंवार होण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे अतिक्रमण तातडीने हटवून नाल्यांचे मार्ग मोकळे करण्याची आवश्यकता आहे.

उदळी बुद्रुक परिसरातील शेतकरी आज संकटात असून "प्रशासनाकडे आमच्या शेतीकडे लक्ष देण्यास वेळ नाही; आम्ही मरण यातनेत जगत आहोत. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा पर्याय उरणार नाही," असे त्यांनी भावनिक आवाहन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.