Contact Banner

दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक


दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक


दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

सण शांततेत व एकोप्याने पार पाडण्याचे आवाहन

लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर, दि. 19 सप्टेंबर) – आज शुक्रवार रोजी सकाळी साडेदहा वाजता सावदा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये शांतता समितीची बैठक पार पडली. येत्या दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखणे, सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणे व उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे व राहुल सानप उपस्थित होते. याशिवाय सावदा परिसरातील पत्रकार बांधव, दुर्गा उत्सव मंडळांचे पदाधिकारी, हिंदू-मुस्लिम समाजाचे मान्यवर, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीच्या सदस्या तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने या बैठकीत सहभागी झाले.

बैठकीदरम्यान दुर्गा उत्सवाच्या आयोजनात येणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली. उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः मंडळ पदाधिकारी व मुस्लिम बांधवांचे मुद्दे शांततेत ऐकून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ढवळे यांनी सांगितले की, “दुर्गा उत्सव हा आनंदाचा, भक्तीचा आणि एकतेचा सण आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता परस्पर सहयोगातून शांतता राखावी. सर्वांनी सामाजिक सौहार्द जपत उत्सव साजरा करावा, हीच खरी परंपरा आहे.”

सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी सतर्क राहील, असे स्पष्ट केले. तसेच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षेसाठी जबाबदारीने वागावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीच्या अखेरीस शांतता समितीचे सदस्य, दुर्गा उत्सव मंडळ पदाधिकारी तसेच दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. सर्वांनी मिळून एकोप्याने व धार्मिक सौहार्दाच्या वातावरणात उत्सव पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.