चिनावल शिवारात तरुणाचा मृतदेह; खून की आत्महत्या?
चिनावल शिवारात तरुणाचा मृतदेह; खून की आत्महत्या?
लेवा जगत न्यूज सावदा :– रावेर तालुक्यातील चिनावल शिवारात सोमवारी (दि. १५ सप्टेंबर) एका विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. निखिल पितांबर भारंबे यांच्या शेतातील विहिरीत हा मृतदेह तरंगताना सापडला. मृताची ओळख समीर सुराज तडवी (वय ३०, रा. चिनावल) अशी झाली आहे.
समीर तडवी हा ९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होता. सहा दिवसांनंतर त्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याने गावात विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की खून, याबाबत स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
या घटनेची माहिती साहिल इलमोद्दिन तडवी (वय २६) यांनी सावदा पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
या प्रकरणात सावदा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत