पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर
लेवा जगत न्यूज प्रतिनिधी पुणे–पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून ते तुरुंगात होते. सत्र न्यायालयाने खेवलकर यांच्यासह या प्रकरणातील इतर आरोपींनाही जामीन मंजूर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी विश्वास व्यक्त केला की, “प्रांजल खेवलकर लवकरच निर्दोष मुक्त होतील.”
दरम्यान, 27 जुलै रोजी पुण्यातील खराडी परिसरात पोलिसांनी अंमली पदार्थांच्या पार्टीवर छापा टाकून काही महिलांसह प्रांजल खेवलकर यांना अटक केली होती. या छाप्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. पोलिसांच्या तपासात खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप प्रमुख होता.
या अटकेमुळे राज्यभरात मोठी चर्चा रंगली होती. बीड जिल्ह्यातील एका स्वयंसेवी संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील काही आरोप खेवलकर यांच्यावर केले होते.
दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर, पुणे सत्र न्यायालयाने प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर केला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यांची आज येरवडा कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत