ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून अनधिकृत वृक्षतोड; नागरिकांमध्ये संताप
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून अनधिकृत वृक्षतोड; नागरिकांमध्ये संताप
लेवाजगत न्यूज शिंगाडी (ता. रावेर, जि. जळगाव) :
शिंगाडी गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून अनधिकृत वृक्षतोड केल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. सरपंच व उपसरपंच यांनी मिळून गावातील सार्वजनिक ठिकाणी असलेली सुमारे ३ निम वृक्ष ८ सप्टेंबर २०२५ रोजी कोणतीही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता तोडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
विशेष म्हणजे, मागील वर्षी याच ग्रामपंचायतीने अधिकृत पत्र जारी करून गावातील कोणीही व्यक्ती अनधिकृत रित्या वृक्षतोड करू नये, असे स्पष्टपणे नमूद केले होते. परंतु आता स्वतःच्याच नियमांना धाब्यावर बसवत ग्रामपंचायत पदाधिकारी अशा प्रकारे गुन्हा करत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक मालकीची झाडे कोणत्याही सक्षम परवानगीशिवाय तोडणे हे महाराष्ट्र वृक्षसंपादन कायदा १९७५ तसेच भारतीय वनसंपादन कायदा १९२७ अंतर्गत गुन्हा ठरतो. या संदर्भात बौद्ध पंच ट्रस्ट शिंगाडी यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, “गावातील सार्वजनिक जागेवरील वृक्ष तोडल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. नियम बनवणारीच ग्रामपंचायत जर नियम तोडत असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंब करू.”
या प्रकरणामुळे गावात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असून, प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत