वनोली शिवारात मोर व लांडोरची शिकार – दोघांना बंदुकीसह रंगेहात पकडले
वनोली शिवारात मोर व लांडोरची शिकार – दोघांना बंदुकीसह रंगेहात पकडले
लेवाजगत न्यूज यावल : तालुक्यातील वनोली शेतशिवारातील घनदाट जंगलात रविवारी रात्री मोर व लांडोर या वन्य पक्ष्यांची बेकायदेशीर शिकार करण्यात आली. ग्रामस्थांच्या दक्षतेमुळे मारूळ येथील दोन शिकारींना वनविभागाने बंदुकीसह रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वनोली परिसरातील मोर व लांडोर यांच्या मोठ्या प्रमाणात वावर आहे. रविवारी रात्री दोन मोटरसायकलींवरून चार ते पाच संशयित या परिसरात आले. ग्रामस्थांना ते केबल चोर असल्याचा संशय आला. मात्र मध्यरात्री अचानक बंदुकीचा आवाज झाल्याने ते शिकारी असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत तातडीने वनविभागास माहिती देण्यात आली.
यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने केळीच्या शेतातून मारूळ येथील दोन व्यक्तींना पकडले. त्यांच्या ताब्यातून बंदूक व पाच मृत मोर-लांडोर जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे वनविभागाने गुप्त ठेवली असून, त्यांच्या सोबत आणखी कोणी टोळी कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
👉 लेवा जगत न्यूज वृत्तपत्र बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा -89836 89 844
कोणत्याही टिप्पण्या नाहीत