Contact Banner

“ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही”; मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती – मदत मात्र मिळणार

 

CM Fadnavis's clarification: Will not come to declare drought, will only get help

“ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही”; मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती – मदत मात्र मिळणार

लेवाजगत न्यूज मुंबई – मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. हजारो शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, जमिनी खरडल्या गेल्या, घरांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शेतकरी व विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, नियमांमध्ये ओला दुष्काळ अशी कोणतीही संकल्पना नाही, त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही. मात्र, दुष्काळ घोषित झाल्यास शेतकऱ्यांना ज्या सवलती आणि उपाययोजना मिळतात, त्या सर्व सवलती या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. तथापि, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने निर्णय घेतला आहे की दुष्काळी उपाययोजना व सवलती या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळतील. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखाच परिणाम होईल.

अतिवृष्टीमुळे तब्बल ६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पहिल्या टप्प्यात, म्हणजेच ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास सुरुवात झाली असून यासाठी २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीचे वितरण सुरू झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मदत देताना शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची अट शिथील करण्यात आली असून पुढील दोन-तीन दिवसांत यासंदर्भातील सर्व माहिती जाहीर केली जाईल. काही भागात अजूनही पाणी साचले असल्याने पंचनाम्याची मुदत दोन ते तीन दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जेवढी शक्य तितकी मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.