दर्जेदार संशोधन समाज व देशाच्या विकासात सहाय्यभूत –प्रा.डॉ.विकास गीते
दर्जेदार संशोधन समाज व देशाच्या विकासात सहाय्यभूत –प्रा.डॉ.विकास गीते
लेवाजगत न्यूज फैजपूर – “अध्ययन, अध्यापनासहित संशोधन हा उच्च शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. दर्जेदार संशोधनातून संशोधकास उत्तम करिअर, पदोन्नती, पुरस्कार व पेटंटची संधी मिळते. समाजाभिमुख व अस्सल संशोधनाबरोबरच आकर्षक सादरीकरण केले, तर ते समाज व देशाच्या विकासात मोलाचा हातभार ठरते”, असे प्रतिपादन प्रा. डॉ. विकास गीते (विभाग प्रमुख, पॉलिमर केमिस्ट्री, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांनी केले.
ते धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंटरनल कॉलिटी ॲशुरन्स सेल (IQAC) व संशोधन समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “संशोधन पद्धती” या विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. कल्पना पाटील यांनी भूषविले. तसेच उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. हरीश नेमाडे, सहसमन्वयक प्रा. डॉ. हरीश तळेले यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रा. डॉ. नेमाडे यांनी उच्च शिक्षणातील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करताना संशोधन प्रवासातील अडचणींवर योग्य मार्गदर्शन मिळाले, तर तो आनंददायी आणि यशस्वी ठरतो, असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेच्या अध्यक्ष प्रा. डॉ. कल्पना पाटील यांनी आपल्या भाषणात “दर्जेदार संशोधन ही काळाची गरज आहे. भारताला विकसित राष्ट्रांच्या यादीत नेण्यासाठी समाजाभिमुख संशोधन आवश्यक असून, संशोधकांनी समाजातील समस्या शोधून त्यावर उपाय सुचविल्यास समाजाचा जीवनस्तर उंचावेल” असे आवाहन केले.
🔹 कार्यशाळेतील सत्रे :
प्रथम सत्र – प्रा. डॉ. विकास गीते यांचे “संशोधन प्रबंध लेखनाची तंत्रे”
द्वितीय सत्र – प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी (बोदवड) यांचे “संशोधन साहित्य पुनरावलोकन” दृकश्राव्य सादरीकरण
तृतीय सत्र – प्रा. डॉ. अनिल बारी (बोदवड) यांचे “संशोधन आराखडा व मापदंड”
सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र राजपूत, प्रा. डॉ. पल्लवी भंगाळे, प्रा. नाहीदा कुरेशी, प्रा. शिवाजी मगर व प्रा. सुवर्णा पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. हरीश तळेले यांनी केले.
या कार्यशाळेत एकूण २९८ पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून कार्यशाळा यशस्वी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत