“तुझा कार्यक्रम लावून टाकतो, जीव वाचणार नाही तुझा”-अधीक्षक अभियंत्याची धमकी अजय बढे यांची पोलिस अधिक्षकांकडे संरक्षणाची मागणी
“तुझा कार्यक्रम लावून टाकतो, जीव वाचणार नाही तुझा”-अधीक्षक अभियंत्याची धमकी
अजय बढे यांची पोलिस अधिक्षकांकडे संरक्षणाची मागणी
लेवाजगत न्यूज जळगाव (प्रतिनिधी) :तापी पाटबंधारे विकास महामंडळातील भ्रष्टाचार, बनावट कागदपत्रे व कोट्यवधींच्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश करणारे अजय भागवत बढे यांना थेट जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही धमकी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन यांनी दिल्याचा आरोप आहे.
ही घटना दिनांक २२ सप्टेंबर रोजी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाजवळ घडली. अजय बढे यांनी केलेल्या तक्रारींवर मुख्य अभियंता यांच्या आदेशानुसार चौकशी सुरू आहे. या अनुषंगाने अधिक्षक अभियंता श्री. भोसले यांना संबंधित कागदपत्रे देण्यासाठी बढे दुपारी गेले होते. मात्र भोसले कार्यालयात नसल्याने ते बाहेर पडत असताना, खालच्या मजल्यावर उपस्थित असलेले गोकुळ महाजन यांनी अजय बढे यांना पाहून उघडपणे धमकी दिली. “आमच्या विरोधात तक्रारी करतोस का… तुझा कार्यक्रम लावून टाकतो, जीव वाचणार नाही तुझा,” असे शब्द महाजन यांच्या तोंडून उच्चारले गेल्याचा आरोप आहे. या घटनेची नोंद जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा म्हणून करण्यात आली आहे.
जुन्या प्रकरणांचा संदर्भ
यापूर्वी शेततळ्यांची कामे मिळवून देतो असे आमिष दाखवून सेवानिवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी. पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून अजय बढे यांची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी सध्या जामिनावर आहेत.
याचबरोबर बोदवड उपसा सिंचन योजनेतील वाळू तस्करी व शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक या प्रकरणातही बढे यांनी पुराव्यासह तक्रार केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अमळनेर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे.
पोलिसांवर ढिलाईचा आरोप
अजय बढे यांनी याआधीही (१३ मार्च रोजी) जीवाला धोका असल्याची माहिती देत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावर ठोस कारवाई न झाल्याने आरोपी अधिक बळकट झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“जर माझ्या जीवाला काही अनिष्ट घडले तर त्याची थेट जबाबदारी गोकुळ महाजन व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर राहील,” असा इशारा अजय बढे यांनी आपल्या तक्रारीत दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत