मुक्ताईनगरातील पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; पाच दरोडेखोर जेरबंद!
मुक्ताईनगरातील पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; पाच दरोडेखोर जेरबंद!
रोख रक्कम, शस्त्रांसह आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची अवघ्या चार दिवसांत धडाकेबाज कारवाई
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर-जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केवळ चार दिवसांत उघडकीस आणत पाच दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. तसेच एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या धाडसी कारवाईमुळे परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री मुक्ताईनगर येथील रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करत रोकड लुटून पलायन केले होते. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्याच टोळीने कर्की फाटा (ता. मुक्ताईनगर) येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप आणि वरणगाव शिवारातील सैय्यद पेट्रोल पंपावरही लूटमार केली होती. दरोडेखोरांनी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर चोरले व एकूण १ लाख ३३ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि भुसावळचे उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकातील पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे आणि ग्रेडेड पीएसआय रवी नरवाडे यांनी या मोहिमेत विशेष भूमिका बजावली.
पोलिसांनी चार आरोपींना नाशिक येथून, तर एका आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अकोल्यातून ताब्यात घेतले. अटक आरोपींची नावे अशी आहेत – सचिन अरविंद भालेराव (वय ३५, भुसावळ, मूळ रा. खकनार, जि. बुर्हाणपूर, म.प्र.), पंकज मोहन गायकवाड (वय २३, वेडीमाता मंदिर, जुना सातारा रोड, भुसावळ), हर्षल अनिल बावस्कर (वय २१, बाळापूर, जि. अकोला), देवेंद्र अनिल बावस्कर (वय २३, बाळापूर, जि. अकोला) आणि प्रदुम्न दिनेश विरघट (वय १९, श्रद्धा नगर, कौलखेड, अकोला).
पोलिसांनी आरोपींकडून ४० हजार रुपये रोख रक्कम, तीन गावठी पिस्तुले, पाच मॅगझिन, नऊ मोबाईल फोन आणि एक निळी सॅक बॅग असा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत मुख्य आरोपी सचिन भालेराव याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि दंगल यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे. तसेच २०२४ मध्ये त्याला महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.
या कारवाईमुळे मुक्ताईनगर, भुसावळ आणि परिसरातील नागरिक व व्यापारी वर्गात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत